कर्नाटक प्रमाणे महाराष्ट्राचेही चित्र बदलणार

0
294

नगर, दि. २१ (पीसीबी) कर्नाटकप्रमाणेच देशाचे चित्र बदलण्यासाठी एकजुटीची आवश्यकता असल्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी आज, रविवारी नगरमध्ये बोलताना केले. यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार हल्ला करत देशातील सत्ताधारी जाती-धर्माच्या आधारे संघर्ष निर्माण करत असल्याचाही आरोप केला.

हमाल मापाडी महामंडळाचे २१ वे द्वैवार्षिक अधिवेशन आज नगरमध्ये आयोजित करण्यात आले होते. त्याच्या उद्घाटनप्रसंगी खासदार शरद पवार बोलत होते. अध्यक्षस्थानी कामगार नेते डॉ. बाबा आढाव होते. नगर हा पुरोगामी जिल्हा, परंतु या जिल्ह्यातील शेवगावसारख्या गावात जातीय संघर्ष निर्माण केला जात आहे. त्याविरुद्ध लढा दिला नाही तर कष्टकऱ्यांची जीवन उद्ध्वस्त होईल, असाही इशारा शरद पवार यांनी दिला.

हमाल मापडींना कायद्याचे संरक्षण आहे, या संरक्षणावर हल्ला करण्याचे काम काहीजण करत आहेत, त्यांना माथाडी कायदा खुपतो आहे. हा कायदा जुना झाले असे ते सांगत आहेत. परंतु या कायद्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला आहे. फडणवीस सरकारने आता ३६ जिल्ह्यांसाठी एकच महामंडळ स्थापन करण्याचा प्रयत्न केला. पण तो माथाडीने एकजुटीने हाणून पाडला. माथाडींवर गुंडगिरी व पैसे लुबाडण्याच्या प्रयत्नचा आरोप करून चळवळील बदनाम करण्याचा प्रयत्न होत आहे. त्या विरोधात आवाज उठवावा लागेल. एकजूट दाखवावी लागेल, असेही खासदार पवार म्हणाले.

कामगार नेते बाबा आढाव यांचा मंत्री विखे यांच्यावर जोरदार हल्ला
यावेळी बोलताना कामगार नेते बाबा आढाव यांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या भूमिकेवर जोरदार हल्ला चढवला. माथाडी कायद्याच्या नावाखाली गुंडगिरी कोण करत आहे? याची नावे विखे यांनी जाहीर करावीत, या कायद्याच्या निधीची जबाबदारी कोणावर नाही, आमच्याच घामातून आम्हाला सुविधा दिल्या जात आहेत, तरीही कायद्याचे संरक्षण काढण्याची भाषा केली जात आहे. परंतु विखे यांच्या आजोबांच्या पुढाकारातून साखर कामगारांनी श्रीरामपूरमध्ये साखर कामगार रुग्णालय सुरू केले, महाराष्ट्राने देशाला माथाडी कायदा दिला, याची जाणीव विखे यांनी ठेवावी, याच कारणातून नगरला अधिवेशन घेण्यात आले, असे बाबा आढाव यांनी स्पष्ट केले.