कर्नाटकात भाजपला काँग्रेसचा मोठा झटका

0
366

बेंगळुरू, दि. २३ (पीसीबी) – कर्नाटकमधील काँग्रेस सरकारने केंद्रातील सत्ताधारी भाजपला मोठा झटका दिला आहे. कर्नाटकमधील सिद्धारामय्या सरकारने हिजाबबंदीचा निर्णय मागे घेतला आहे. मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांनी म्हैसूरमधील एका सभेत ही घोषणा केली.

हिजाबबंदी मागे घेण्याचे आदेश आपण प्रशासनाली दिले आहेत. यामुळे महिलांना हवे ते कपडे त्या परिधान करू शकतात, असे मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांनी स्पष्ट केले आहे. कुठले अन् कशा प्रकारचे कपडे घालायचे आणि काय खायचे हा प्रत्येकाचा वैयक्तिक विषय असल्याचे सिद्धारामय्या म्हणाले.

आम्ही हिजाबबंदी मागे घेत आहोत. तुम्ही हिजाब घालून कुठेही जाऊ शकता. हिजाबबंदी मागे घेण्याचे आदेश मी दिलेले आहेत. कोणते कपडे घालायचे आणि काय खायचे या नागरिकांचा निर्णय आहे. त्याला आम्ही अडकाठी घालणार नाही. तुम्हाला हवे ते कपडे घाला. आणि हवे ते खा, असे मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांनी स्पष्ट केले. काय कपडे घालायचे हा प्रत्येकाचा विशेष अधिकार आहे, असे म्हणत मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांनी भाजपवर हल्लाबोल केला. भाजपने कपडे आणि खाण्याच्या मुद्द्यावरून जाती-धर्मात लोकांमध्ये फूट पाडून द्वेषाचे राजकारण केले, असा आरोपही कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी केला.

कर्नाटकमध्ये भाजपच्या बसवराज बोम्मई सरकारने 2022 मध्ये राज्यातील सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाबबंदी केली होती. या हिजाबबंदीला राज्यात आणि देशात मुस्लीम समाजाकडून तीव्र विरोध करण्यात आला होता. अनेक ठिकाणी मोर्चे काढण्यात आले होते. हे प्रकरण कर्नाटक उच्च न्यायालयातही गेले होते. कर्नाटकमधील भाजप सरकारच्या हिजाबबंदीच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. उच्च न्यायालयाने सरकारचा निर्णय योग्य ठरवला होता.

हिजाबचा वापर करणे मुस्लीम धर्माचा अनिवार्य भाग नाही. त्यामुळे विद्यार्थी शाळा-कॉलेजने ठरवलेला गणवेश परिधान करण्यास नकार देऊ शकत नाहीत. हिजाबबंदीवर आक्षेप घेता येणार नाही, असे स्पष्ट करत न्यायालयाने हिजाबशी संबंधित आठ याचिकाही फेटाळून लावल्या होत्या.