कर्नाटकात ‘नंदिनी’ विरुद्ध ‘अमूल’ दुधाच्या ब्रँडचा वाद पेटला?

0
163

कर्नाटक, दि. १० (पीसीबी) – कर्नाटकात ‘अमूल’च्या प्रवेशावरून सुरू झालेला वाद आणखी चिघळला असून आता हॉटेल व्यावसायिकांनी ‘अमूल’वर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. बृहद बंगळूरु हॉटेल संघटनेने राज्यातील (दूध उत्पादक) शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्यासाठी केवळ ‘नंदिनी’ दूध वापरण्याची घोषणा केली. यामुळे ‘अमूल’ला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.

कर्नाटकात विधानसभा निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापलेले असताना दुधाचे राजकारणही चांगलेच रंगलेले दिसत आहे. काँग्रेस आणि धर्मनिरपेक्ष जनता दलाने कर्नाटकात अमूलला प्रवेश देण्याला आधीपासून विरोध केला आहे, तसेच बोम्मई सरकारचा हा निर्णय म्हणजे कर्नाटक दूध संघाची प्रतिष्ठित नाममुद्रा असलेली ‘नंदिनी’ संस्था ‘अमूल’ला विकण्याचा डाव असल्याचा आरोप या विरोधी पक्षांनी केला आहे. सत्ताधारी भाजपने मात्र हे आरोप फेटाळले आहेत.

‘आम्हा सर्वाना आपल्या शेतकऱ्यांचे उत्पादन असलेल्या कर्नाटकच्या नंदिनी दुधाचा अभिमान आहे आणि त्याला प्रोत्साहन दिले पाहिजे. आमच्या शहरामध्ये स्वच्छ आणि चविष्ट कॉफी न्याहारीचा मुख्य भाग आहे. अलीकडेच इतर राज्यांमधील दूध कर्नाटकात येत असल्याचे आम्ही ऐकले आहे. आम्ही सर्व नंदिनीबरोबर आहोत,’ असे हॉटेल व्यावसायिकांच्या संघटनेने काढलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
राजकीय वाद

माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी शुक्रवारी अमूलच्या उत्पादनांवर बहिष्कार घालण्याचे आवाहन केले होते. तर ‘अमूल म्हणजे भाजप आणि नंदिनी म्हणजे काँग्रेस असे तुम्हाला म्हणायचे आहे का’ असा प्रश्न राज्याचे आरोग्यमंत्री के. सुधाकर यांनी विचारला होता. काहीच दिवसांपूर्वी दह्याच्या पाकिटावर हिंदीतून नाव लिहिण्याचे निर्देश भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने दिले होते. त्यावरून दक्षिणेच्या राज्यांमध्ये वाद उफाळला होता, अखेर संबंधित निर्देश मागे घ्यावे लागले होते.

४० टक्के दलाली घेणाऱ्यांना मतदार कंटाळले : थरूर

बंगळुरू : ‘‘कर्नाटकवासीय सत्ताधाऱ्यांच्या ४० टक्के दलालीच्या व्यवहारांना कंटाळले आहेत. त्यांना १०० टक्के बांधिलकी हवी. अवघ्या कर्नाटकात राज्य व शहरी प्रशासनातील गंभीर त्रुटी हाताळून दूर करण्यासाठी काँग्रेस समर्थ आहे,’’ असे माजी केंद्रीय मंत्री व ज्येष्ठ काँग्रेस नेते खासदार शशी थरूर यांनी रविवारी येथे सांगितले. ते म्हणाले, की कर्नाटकातील लोक ४० टक्के दलालीस कंटाळले आहेत. त्यांना १०० टक्के वचनबद्धता हवी आहे. आम्ही त्यांच्या भल्यासाठी १०० टक्के बांधील असू.
प्रदेश काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदी चंद्रप्पा

नवी दिल्ली : कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे वेध लागले असताना काँग्रेसने बी. एन. चंद्रप्पा यांची राज्य शाखेच्या कार्याध्यक्षपदी नियुक्ती केली. काँग्रेसने रविवारी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात नमूद केले, की काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी चंद्रप्पा यांची या निवड केली आहे. कर्नाटकच्या प्रदेशाध्यक्षपदी डी. के. शिवकुमार आहेत

गेल्या महिन्यात कर्नाटक काँग्रेसचे कार्याध्यक्ष आर, ध्रुवनारायण यांचे निधन झाल्याने चंद्रप्पा यांची ही नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेसने आतापर्यंत १६६ उमेदवारांची घोषणा केली आहे.