कर्नाटकाच्या मुख्यमंत्री पदासाठी दावा सांगणाऱ्या डी.के. शिवकुमारांबाबत सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय…

0
261

देश,दि.१४(पीसीबी) – कर्नाटकचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी.के. शिवकुमार यांना सुप्रीम कोर्टानं मोठा दिलासा दिला आहे. केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने त्यांच्याविरोधात कारवाईसाठी दाखल केलेल्या याचिकेवर १४ जुलैपर्यंत स्थगिती दिली आहे. न्यायमूर्ती बी.आर.गवई आणि न्यायमूर्ती संजय करोल यांच्या खंडपीठानं हा निर्णय दिला आहे. ज्येष्ठ विधिज्ञ अभिषेक सिंघवी यांनी सुप्रीम कोर्टात डी.के.शिवकुमार यांची बाजू मांडली आहे.

कर्नाटक उच्च न्यायालयाने १० फेब्रुवारी रोजी डी.के. शिवकुमार यांच्याविरोधात भष्ट्राचारप्रकरणी सीबीआयच्या कारवाईवर स्थगिती दिली होती. त्यानंतर तीन तारखा देत ही स्थगिती दिली होती. आयकर विभागाने २०१७ मध्ये शिवकुमार यांच्यावर छापेमारी केली होती. त्याआधारे ईडीने त्यांच्याविरोधात चौकशी सुरु केली आहे. ईडीनंतर सीबीआयने शिवकुमार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी राज्य सरकारकडे मंजूरी मागितली होती. त्यानंतर २०२० मध्ये डी.के. शिवकुमार यांच्याविरोधात सीबीआयने तक्रार दाखल केली होती. त्याला शिवकुमार यानी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर आपल्याला मानसिक त्रास देत असल्याचा आरोप डी.के.शिवकुमार यांनी केला.

कर्नाटकचे मुख्यमंत्री कोण होणार, यावर गेल्या चार दिवसापासून चर्चा सुरु आहे. सिद्धरामय्या यांची मुख्यमंत्रीपदी नियुक्ती करण्याचा निर्णय पक्षश्रेष्ठींनी घेतला असल्याचे समजते, याची घोषणा राहुल गांधी लवकरच करणार आहेत.चार दिवसांपासून मुख्यमंत्री पदाबाबत दिल्लीमध्ये अनेक बैठका झाल्या.

दरम्यान मुख्यमंत्रीपदासाठी डी.के.शिवकुमार आणि सिद्धरामय्या हे शर्यतीत आहेत. याबाबतचा निर्णय घेण्याची जबाबदारी पक्षश्रेष्ठींनी मल्लिकार्जून खर्गे यांच्यावर सोपवली होती. त्यानंतर दोन दिवसापूर्वी काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक झाली. पण अद्याप डी.के.शिवकुमार आणि राहुल गांधी यांची चर्चा सुरु आहे. मुख्यमंत्रीपदावर ते अजूनही ठाम असल्याचे समजते.