बेंगळुरू, दि. १ (पीसीबी) : कर्नाटकमध्ये भाजप आमदाराने भगवान श्रीराम यांच्या फोटोचा अवमान केल्याचा आरोप करण्यात येत आहे. याबाबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. राज्यात विधानसभेच्या निवडणुकीचा माहोल असतानाच ही घटना घडल्याने भाज वर्तुळात अस्वस्थता आहे.
श्रीरामनवमीच्या कार्यक्रमात भाजप आमदार शरणु सालागर यांनी भगवान श्रीरामांना हार अर्पण करण्यासाठी आणि फोटो काढण्यासाठी गेले असता हा प्रकार घडल्याचे दिसते. कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा प्रकार घडल्यामुळे राजकारण तापलं आहे. निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टी श्रीरामाचा वापर करते, असा आरोप काँग्रेसने केला आहे. भाजप नेत्यांची श्रीराम भक्ती ही खोटी असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.
आमदार शरणु सालागर हे कर्नाटकातील बीदर जिल्ह्यातील बसवकल्याण विधानसभा मतदार संघातील आमदार आहेत. त्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने काँग्रेसने त्यांच्यावर निशाना साधला आहे. सालागर यांचा सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी चांगलाच समाचार घेतला आहे.
बुधवारी निवडणूक आयोगाने 224 सदस्यीय कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत.येथे एकाच टप्यात 10 मे रोजी मतदान होणार आहे. 13 मे रोजी मतमोजणी होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दक्षिणेकडील राज्यात विकासाच्या खेळपट्टीवर भारतीय जनता पक्ष उभा आहे.
दक्षिणेतील एकमेव भगव्या बालेकिल्ल्यात ‘डबल इंजिन’ सरकार सुरू ठेवण्याचे आवाहन ते करत आहेत. भाजपकडे सध्या 119 जागा आहेत, तर काँग्रेसकडे 75 जागा आहेत. जेडीएसकडे 28 आमदार आहेत, तर दोन जागा रिक्त आहेत.