कर्तव्यावरील पोलीस महिलेला मारहाण, महिलेस अटक

0
282

पिंपरी, दि ४ (पीसीबी)- कर्तव्य बजावत असलेल्या पोलीस कर्मचारी महिलेला एका महिलेने मारहाण केली. विरुद्ध दिशेने जाणाऱ्या वाहन चालकाचा परवाना निलंबित करण्याची कारवाई करत असताना रविवारी (दि. 2) रात्री पावणे नऊ वाजता फुगेवाडी चौक येथे हा प्रकार घडला.

संगीता शांताराम कदम (वय 27, रा. पिंपळे गुरव) असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस कर्मचारी महिलेने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या वाहतूक विभागात नेमणुकीस आहेत. फुगेवाडी येथे कर्तव्य बजावत असताना एमएच 14/एचएस 2105 क्रमांकाच्या दुचाकीवरून धरमिंदर मनजित सिंग हा विरुद्ध दिशेने दुचाकी घेऊन आला. त्याच्यावर वाहन चालविण्याचा परवाना निलंबित करण्याची कारवाई फिर्यादी करीत होत्या. त्यावेळी धरमिंदर याच्या पाठीमागे बसलेल्या आरोपी महिलेने फिर्यादी यांच्या हातातून धरमिंदर याचा वाहन चालविण्याचा परवाना घेतला. तो तोडून फेकून दिला. तुला काय करायचे ते कर, माझ्याकडे पण वर्दी आहे, अशी महिलेने फिर्यादी यांना धमकी दिली. महिलेने फिर्यादीसोबत धक्काबुक्की, मारहाण करून शिवीगाळ केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.