कर्ज मंजूर करून देण्याच्या बहाण्याने अडीच लाखांची फसवणूक

0
312

काळेवाडी, दि. २१ (पीसीबी) – हॉटेलचे नूतनीकरण करण्यासाठी पाच कोटी रुपयांचे कर्ज मंजूर करून देतो, असे आमिष दाखवून हॉटेल व्यावसायिकाची अडीच लाखांची फसवणूक केली. ही घटना मे 2022 ते 20 सप्टेंबर 2022 या कालावधीत काळेवाडी फाटा येथे घडली.

अमोल माणिकराव पाचपुते (वय 41, रा. काष्टी, ता. श्रीगोंदा, अहमदनगर) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार बालाजी बळीराम घोडके (वय 32), संग्राम यादव (वय 45), मुजावर फायनान्सचे मालक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आपसात संगनमत करून फिर्यादीचा विश्वास संपादन करून हॉटेलचे नूतनीकरण करण्यासाठी पाच कोटी रुपये कर्ज मंजूर करून देतो, असे आमिष दाखवले. त्यासाठी फिर्यादीकडून दोन लाख 45 हजार रुपये घेतले. पैसे घेऊन कर्ज मंजूर करून दिले नाही. फिर्यादींनी आरोपींना फोन करून याबाबत विचारणा केली असता आरोपींनी त्यांना धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.