कर्जाचा हप्ता न भरल्याने फायनान्स कंपनीच्या रिकव्हरी एजंटने केला महिलेचा विनयभंग

0
998

मोशी, दि. ७ जून, (पीसीबी)- चोलामंडलम फायनान्स कंपनीच्या रिकव्हरी एजंटने त्याच्या व्यवस्थापकाच्या सांगण्यावरून कर्जाच्या हप्त्याची विचारणा करण्यासाठी एका महिलेच्या घरात जाऊन महिलेचा विनयभंग केला. ही घटना 11 मे रोजी सायंकाळी साडेपाच वाजता मोशी प्राधिकरण येथे घडली.

रिकव्हरी एजंट अमोल बापू ठोंबरे (वय 30, रा. चिखली), व्यवस्थापक आकाश कदम (वय 35, पूर्ण पत्ता माहिती नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पिडीत महिलेने मंगळवारी (दि. 6) एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चोलामंडलम इनव्हेस्टमेंट अँड फायनान्स कंपनीमध्ये अमोल ठोंबरे हा रिकव्हरी एजंट म्हणून काम करतो. फिर्यादी यांच्या पतीने त्या फायनान्स कंपनीकडून कर्ज घेतले आहे. त्या कर्जाचा हप्ता थकल्याने व्यवस्थापक आकाश कदम याच्या सांगण्यावरून अमोल ठोंबरे हा कंपनीच्या पत्त्यावर न जाता फिर्यादी यांच्या घरच्या पत्त्यावर आला. फिर्यादी महिला घरात एकट्या असताना त्याने घराचा दरवाजा जबरदस्तीने ढकलला. फिर्यादी यांनी त्यास विरोध केला असता त्याने फिर्यादिसोबत गैरवर्तन करून त्यांचा विनयभंग केला. जबरदस्तीने घरात घुसून फिर्यादी यांच्या पतीची पाहणी केली. पती घरात मिळून आले नाहीत म्हणून त्याने फिर्यादीस शिवीगाळ केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

रिकव्हरी एजंटवर झाला होता गोळीबार

फिर्यादी यांच्या पतीने आरोपी रिकव्हरी एजंट अमोल ठोंबरे याला घाबरविण्यासाठी गोळीबार केला होता. ती गोळी भिंतीवर लागली होती. याबाबत अमोल याने पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती दिली होती. याप्रकरणी ठोंबरे याच्या फिर्यादीवरून गुन्हाही दाखल झाला आहे.