दि.११(पीसीबी)-पिंपरी-चिंचवड शहरात दररोज वाढणारे कर्करोगाचे (कॅन्सर) रुग्ण, त्यावरील उपचारांसाठी येणारा लाखो रुपयांचा खर्च, सामान्यांना खासगी रुग्णालयांचे न परवडणारे दर अशा परिस्थितीत गेल्या अनेक वर्षांपासून मागणी असलेल्या कर्करोग रुग्णालय उभारणीला अखेर प्रारंभ झाला आहे. महापालिकेच्या वतीने शहरातील कर्करोगग्रस्त रुग्णांना अल्प दरात उपचार मिळावेत यासाठी सार्वजनिक खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर थेरगावात कर्करोग रुग्णालय उभारले जात आहे. संबंधित ठेकेदाराला कार्यारंभ आदेश दिला असून दोन वर्षांत इमारत बांधून, प्रत्यक्ष रुग्णसेवा सुरू केली जाणार आहे.
थेरगाव येथील महापालिकेच्या थेरगाव रुग्णालयाशेजारी असलेल्या ३५ गुंठे जागेत ११ मजली १०० खाटांचे सुसज्ज कर्करोग रुग्णालय होणार आहे. सार्वजनिक-खासगी भागीदारीतून डिजाईन, बिल्ड, फायनान्स, ऑपरेट (डीबीएफओटी) तत्त्वावर अत्याधुनिक रुग्णालय उभारले जाणार आहे. महापालिकेचे कर्करोगाचे पहिले रुग्णालय असणार आहे. रुग्णालयासाठी १२ मार्च २०२४ रोजी निविदा प्रसिद्ध करण्यात आली होती. मात्र, या निविदा प्रक्रियेस प्रतिसाद मिळाला नाही.
निविदेला तीनवेळा मुदतवाढ दिल्यानंतरही एकच ठेकेदार सहभागी झाला. त्यामुळे या ठेकेदाराला काम देण्याचे १५ डिसेंबर २०२५ रोजी निश्चित करण्यात आले. त्यानुसार करारनामा करून ठेकेदाराला कार्यारंभ आदेश दिला आहे.
ठेकेदार चालविणार रुग्णालय
संबंधित ठेकेदाराकडून इमारतीचे बांधकाम दोन वर्षांत पूर्ण केले जाणार आहे. महापालिका तफावत निधी (व्हॅबिलिटी गॅप फंड) म्हणून ठेकेदाराला ६० कोटी सहा लाख रुपये चार टप्प्यांत देणार आहे. प्रकल्पाचा एकूण खर्च १४३ कोटी रुपये इतका आहे. उर्वरित खर्च ठेकेदार स्वत: करणार आहे.
अत्याधुनिक सुविधा
शहरातील कर्करोगग्रस्तांना एकाच छताखाली सर्व सेवा यामुळे पुरवल्या जाणार आहेत. नागरिकांना उपचारासाठी शहराबाहेर जाण्याची आवश्यकता भासणार नाही. केमोथेरपी, रेडिएशन थेरपी आणि शस्त्रक्रिया यांसारख्या सामान्य कर्करोगाच्या उपचारांव्यतिरिक्त, रुग्णालय समुपदेशन आणि पुनर्वसन यांसारख्या सहायक सेवाही या रुग्णालयात पुरविण्यात येणार आहेत. हे रुग्णालय स्तन, फुफ्फुस, कोलोरेक्टल, प्रोस्टेट आणि गर्भाशय मुखाच्या कर्करोगासह विविध प्रकारच्या कर्करोगाची पूर्तता करण्यासाठी सुसज्ज असणार आहे. रुग्णालयामध्ये लिनियर एक्सीलरेटर्स, ब्रेकीथेरपी युनिट्स आणि पीईटी-सीटी स्कॅनरची सुविधाही दिली जाणार आहे.
महापालिकेने आरोग्य सुविधांचे दर निश्चित केले आहेत. महात्मा ज्योतिबा जनआरोग्य योजना तसेच, केंद्र सरकारच्या आरोग्य योजनेतील दराप्रमाणेच शुल्क आकारले जाणार आहे. त्यामुळे रुग्णांना अल्पदरात उपचार मिळणार आहेत.
कर्करोग रुग्णालय उभारणीसाठी ठेकेदाराला कार्यारंभ आदेश दिला आहे. दोन वर्षांत इमारतीचे काम पूर्ण करून रुग्णालय सुरू करण्यात येईल. रुग्णांना अल्पदरात उपचार दिले जाणार आहेत, असे महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी सांगितले.













































