करोडो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या प्रेमानंद महाराजांची संपत्ती किती…

0
5

दि . १६ ( पीसीबी ) – विराट कोहलीच्या निवृत्तीच्या निर्णयावर “तू आनंदात आहेस का?” असा प्रश्न विचारणारे प्रेमानंद महाराज देशातच नव्हे तर जगभरात प्रसिद्ध आहेत. विराट आणि अनुष्का शर्मा यांच्यासह अनेक सेलिब्रिटी नियमितपणे त्यांच्या दर्शनासाठी येतात. त्यांचा आश्रम, त्यांची जीवनशैली आणि आर्थिक व्यवहार यांविषयी सामान्यांना मोठी उत्सुकता आहे.

प्रेमानंद महाराजांचा आश्रम मथुरा (Mathura) येथे आहे, आणि तो केवळ एक धार्मिक स्थळ नसून लाखो श्रद्धाळूंना आश्रय देणारे केंद्र आहे. आश्रमात दररोज सुमारे ३ कोटी रुपयांचा खर्च होतो, ज्यामध्ये भाविकांच्या जेवणाची, निवासाची आणि सेवाभावी कामांची जबाबदारी घेतली जाते. विशेष म्हणजे, या सर्व सेवा मोफत दिल्या जातात.

महाराजांचा स्वतःचा जेवणाचा खर्च हा फक्त ४०० ते ५०० रुपये इतकाच असतो. त्यांच्याकडे ना मोबाईल फोन आहे, ना बँक खाते, ना स्वतःच्या नावावर जमीन. त्यांनी कधीही आपल्या नावावर मालमत्ता घेतली नाही आणि सरकारी कागदपत्रांमध्ये “प्रेमानंद” हे नावही आढळत नाही. “मी दुःखात असतानाही देव मला मिठी मारतो,” असं ते नम्रतेने सांगतात.

देणग्यांवर चालणारी व्यवस्था, उद्योगपतीही आहेत भक्त-
महाराजांच्या आश्रमाची आर्थिक घडी भक्तांकडून मिळणाऱ्या देणग्यांवर अवलंबून आहे. त्यांचे अनुयायी देशभरात असून अनेक मोठे उद्योगपती आणि प्रतिष्ठित मंडळी नियमित आर्थिक मदत करतात. याशिवाय, महाराजांच्या प्रवचनांमधून आणि धार्मिक कार्यक्रमांमधूनही उत्पन्न मिळतं.

प्रेमानंद महाराज जरी करोडोंचा आश्रम चालवत असले, तरी त्यांचा स्वतःचा जीवनशैली अत्यंत साधी, तत्त्वनिष्ठ आणि भक्तीमय आहे. विराट कोहलीसारख्या सेलिब्रिटींनाही आपल्या मार्गदर्शनाने आणि विचारांनी प्रभावित करणारे हे संत, आज लाखो लोकांचे श्रद्धास्थान झाले आहेत.