करार झालेल्याच पुरवठादारांकडूनच गणवेश खरेदी

0
269

पिंपरी दि. ७ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या बालवाडीपासून ते इयत्ता दहावीच्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी शालेय गणवेश, पीटी गणवेश अणि स्वेटर तीन संस्थांमार्फत खरेदी करण्यासाठी महापालिकेने त्यांच्यासमवेत नऊ वर्षांचा करारनामा केला. मात्र, तीन वर्षांतच महापालिकेने या संस्थांसमवेत केलेले करारनामे रद्द केले. त्यामुळे तीनही पुरवठादार संस्थांनी दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला. या दाव्यावर झालेल्या सुनावणीत न्यायालयाने याच तीन पुरवठादार संस्थांकडून शालेय गणवेश खरेदी करण्याचे आदेश दिले आहेत.

पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागाचे सन 2022-23 शैक्षणिक वर्ष सुरू झाले आहे. त्यानुसार इयत्ता बालवाडी ते इयत्ता दहावीच्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस विद्यार्थ्यांना शालेय गणवेश, पीटी गणवेश अणि स्वेटर वाटप होणे आवश्यक आहे. त्याकरिता प्राथमिक शिक्षण विभागाकडे प्रत्येक लेखाशिर्षावर सन 2022-23 शैक्षणिक वर्षाकरिता स्वतंत्र अशी एकत्रित 22 कोटी 68 लाख 51 हजार रुपये तरतूद उपलब्ध आहे. तसेच माध्यमिक शिक्षण विभागाकडे शालेय विद्यार्थी गणवेश व स्वेटर या लेखाशिर्षावर सन 2022-23 शैक्षणिक वर्षाकरिता स्वतंत्र अशी एकत्रित 5 कोटी 30 लाख रुपये तरतूद उपलब्ध आहे.

शिक्षण मंडळ अस्तित्वात असताना सन 2016-17 मध्ये निविदा प्रक्रिया राबवून श्री महालक्ष्मी ड्रेसेस अॅण्ड टेलरिंग फर्म, श्री प्रेस्टिज गारमेंटस अॅण्ड टेलरिंग फर्म आणि श्री वैष्णवी महिला कॉर्पोरेशन या तीन संस्थांकडून सन 2016-17, सन 2017-18, सन 2018-19 आणि त्यापुढील सहा शैक्षणिक वर्षाकरिता अनुक्रमे शालेय गणवेश, पीटी गणवेश आणि स्वेटरसाठी स्वतंत्र करारनामे करून पुरवठा आदेश देण्यात आले आहेत. मात्र, 1 जून 2019 रोजी महापालिकेच्या प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण विभागामार्फत नोटिसीद्वारे या तीनही संस्थांसमवेतचे करारनामे रद्द करण्यात आले. तसेच सन 2019-20 करिता नव्याने एक वर्षाचा करारनामा करून पुरवठा आदेश देण्यात येईल, असे कळविण्यात आले. परंतु, तीनही संस्थांनी महापालिकेच्या या निर्णयाला असमर्थता दर्शवली आणि महापालिकेविरोधात पुणे दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला.

या दाव्यावरील अंतिम सुनावणीत सन 2019-20 करिता संबंधित पुरवठाधारकांकडून शालेय गणवेश, पीटी गणवेश आणि स्वेटर खरेदी करण्याबाबत निर्देश दिले होते. सन 2019-20 मध्ये कोरोना प्रादुर्भाव असल्याने सर्व शाळा बंद होत्या. त्यामुळे सन 2020-21 या शैक्षणिक वर्षासाठी हे साहित्य खरेदी करून सन 2021-22 करिता वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याप्रमाणे कार्यवाही करण्यात आली.