पिंपरी चिंचवड शहरातून भाजपने हजारो भिंतींवर कमळ चिन्ह रंगवले. कमळ चिन्ह धोक्यात येणार म्हणून महायुतीच्या जागावाटपात मावळ आपल्या वाट्याला यावा म्हणून भाजप कार्यकर्त्यांनी अक्षरशः आकांडतांडव केला. जागा आणि उमेदवार भाजपचाच पाहिजे आणि नसेल तर आम्ही प्रचार कऱणार नाही, अशा वल्गनासुध्दा झाल्या. शहरात भाजपचा जो पवित्रा होता तोच ग्रामिण मावळ तालुक्यात होता. शहरात पक्षाचे अध्यक्ष शंकर जगतपा यांच्या समर्थकांनी जोर बैठका काढल्या आणि मावळात माजी मंत्री बाळा भेगडे यांच्या कार्यकर्त्यांनी बैठक घेऊन इशारे दिले. लोकसभेला २००९ पासून आजवर भाजप-शिवसेना युती म्हणून लढल्याने कमळ चिन्ह कधी दिसले नाही. जे मावळात घडले तेच चित्र शेजारी शिरूर लोकसभा मतदारसंघात होते आणि आजही आहे.
मावळात २००९ मध्ये गजानन बाबर, २०१४ आणि २०१९ मध्ये खासदार श्रीरंग बारणे हे शिवसेनेकडून खासदार झाले. आतासुध्दा ते शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार असल्याने तिथे भाजप कार्यकर्त्यांना शिवसेनेच्या धनुष्याचाच प्रचार करावा लागणार आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघात खुपच विचित्र परिस्थिती आहे. गेली पंचवीस वर्षे तिथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ चिन्हाला विरोध केला आणि आता तिथेही घड्याळ चिन्हाचाच घरोघरी जाऊन प्रचार करायची वेळ भाजप कार्यकर्त्यांवर आली आहे. गंमत म्हणजे मावळात महाआघाडीत ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांना संधी मिळाली आहे आणि ते पक्ष चिन्ह म्हणून मशाल चिन्हाचे बटन दाबा, अस आवाहन करणार आहेत. शिरूर मध्ये महाआघाडीतील राष्ट्रवादी हा घटक पक्ष म्हणून विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना तुतारी वाजवणारा मनुष्य हे चिन्ह मिळाले. तीन निवडणुका शिवसेनेतून लढलेल्या शिवाजीराव आढळराव पाटील यांनी कायम धनुष्यबाण चालवला. आता तेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातून उमेदवार असल्याने त्यांना घड्याळ चिन्हावर मते मागायची आहेत. अशा प्रकारे धनुष्य, मशाल, घड्याळ, तुतारी वाजवणारा मनुष्य ही चिन्हे प्रचारात आहेत. पण दोन्ही मतदारसंघात भाजपचे कमळ यावेळी कुठेच दिसत नसल्याने कार्यकर्त्यामध्ये तीव्र नाराजीचा सुर आहे.
आता लोकसभा निवडणूक संपल्यावर दोनच महिन्यांत विधानसभा आणि लगेचच महापालिक, जिल्हापरिषद, नगरपंचायतीच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. आता महायुती म्हणून लोकसभासाठी बारणे यांना मत मिळावे यासाठी मावळात धनुष्य चालवा म्हणायचे. तिकडे शिरूर लोकसभासाठी घड्याळ चिन्हाचे बटन दाबा म्हणायचे. उद्याच्याला विधानसभा आणि महापालिकेला शिंदे-फडणवीस-पवार यांची महायुती राहणार याची बिलकूल शाश्वती नाही. महापालिकेला दोन शिवसेना, दोन राष्ट्रवादी, भाजप आणि काँग्रेस सर्वजण स्वतंत्र लढले तर चार सदस्यांच्या एका प्रभागात सहा उमेदवार असतील. त्यावेळी मतदारांपुढे काय तोंडानी मत मागायचे हा प्रश्न आहे. लोकसभेला घड्याळ चालवा म्हणायचे आणि नंतरच्या विधानसभेला कमळाचे बटन दाबा म्हणत मतदारांची विनवणी करायची.
भोसरीतून दोन वेळा आमदार झालेल्या महेश लांडगे आता राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासाठी प्रचार करताना घड्याळाचे बटन दाबायला सांगणार आणि नंतर विधानसभेला त्याच मतदारांसमोर जाऊन माझ्यासाठी कमळ चिन्हा समोरचे बटन दाबा असे आवाहन करणार. या सगळ्यात मतदारांचा प्रचंड गोंधळ उडणार आहेच. दुसरीकडे घरचे खाऊन नेत्यांसाठी दारोदारी फिरणाऱ्या कार्यकर्त्यांची मोठी कुचंबना होणार आहे. महापालिकेत सत्तेत असणाऱ्या भाजपचे कमळ किमान मावळ, शिरूर लोकसभेत नसल्याने भाजपची अस्वस्थता वाढली आहे. मतदानाला पाच आठवडे आहेत, पण अजूनही भाजपचे नेते आणि कार्यकर्तेसुध्दा प्रचारात यायला तयार नाहीत. सर्वांना भवितव्याची चिंता लागून राहिली आहे. कमळ हद्दपार झाले तर पुढे महापालिका जिंकणे कठिण होईल याची भिती अनेकांना आहे.