कमळावर नव्हे धनुष्य चिन्हावरच लढणार – श्रीरंग बारणे

0
304

पिंपरी, दि. १५ (पीसीबी) : महायुतीचे इच्छुक उमेदवार श्रीरंग बारणे यांनी अखेर ते कुठल्या चिन्हावर आणि कुठल्या पक्षातून लढणार याबाबत स्पष्ट विधान केलं आहे. त्यामुळे भाजपच्या चिन्हावर लढण्याच्या चर्चेला श्रीरंग बारणे यांनी पूर्णविराम दिला आहे. मी शिवसेनेकडूनच आतापर्यंत लढलो आहे. २०२४ ची लोकसभा देखील मी शिवसेनेकडूनच लढणार असं म्हणत बारणे यांनी चर्चेला पूर्णविराम दिला. ते पिंपरीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

मावळ लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचा उमेदवार ठरला असला तरी महायुतीचा उमेदवार अद्याप ठरलेला नाही. मावळ लोकसभा मतदारसंघावर आधीच शिवसेना शिंदे गटाने दावा केला असून श्रीरंग बारणे हेच उमेदवार असण्याची दाट शक्यता आहे. तसा विश्वास अनेक वेळा बारणे यांनी व्यक्त केला आहे. मात्र, शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून संजोग वाघेरे यांचं आव्हान असल्याने बारणे भाजपच्या चिन्हावर लढणार असल्याची जोरदार चर्चा होती. या चर्चेला अखेर बारणे यांनी पूर्णविराम दिला आहे. या आधीच्या लोकसभा, विधानसभा निवडणुका या शिवसेना पक्षाकडून लढले आहेत. त्यामुळे आगामी २०२४ लोकसभा देखील शिवसेनेकडून लढणार असल्याचं ठामपणे बारणे यांनी सांगितलं आहे.

विद्यमान खासदार श्रीरंग बारणे हे दोन वेळेस लोकसभा निवडणूक मोदी लाटेवर निवडून आले असल्याची चर्चा मावळ लोकसभा मतदारसंघात आहे. २०२४ च्या आगामी लोकसभेत मोदींची लाट दिसणार नाही. तसेच, शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून संजोग वाघेरे यांचा चेहरा दिल्याने त्याला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. तर बारणे यांच्या विरोधात सुप्त नाराजीची लाट असल्याचं बोललं जात आहे. म्हणून २०२४ ची आगामी लोकसभा निवडणूक ही श्रीरंग बारणे यांच्यासाठी आव्हानात्मक असणार आहे. मध्यंतरी बारणे हे भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढण्याचा विचार करत होते. तसा त्यांनी सूचक इशारा दिला होता. बारणे हे शिवसेनेवर ठाम असले तरी काही बदल होऊ शकतो. बारणे हे शिवसेना की भाजप चिन्हावर लढतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.