दि.१०(पीसीबी)-पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातल घरगुती गॅस सिलेंडरची प्रयंड टंचाई आहेच, पण कमर्शियल सिलेंडरचा साठा संपल्याने दोन दिवसांत सर्व हॉटेल्स, खानावळी, कारखानदारी बंद पडण्याची शक्यता गॅस पुरवठा करणाऱ्या वितरकांनी व्यक्त केली आहे.
इराण-इस्रायल संघर्षाचे पडसाद आता भारतातही उमटू लागले असून त्याचा थेट परिणाम एलपीजी (LPG) पुरवठ्यावर होताना दिसत आहे. केंद्र सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून व्यावसायिक वापरासाठीच्या एलपीजी सिलेंडरचा पुरवठा तात्पुरता थांबवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. या निर्णयामुळे देशभरातील हॉटेल, रेस्टॉरंट आणि फूड इंडस्ट्रीसमोर मोठे संकट निर्माण झाले असून पुढील काही दिवसांत हा उद्योग ठप्प होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अशातच अनेक शहरांमध्ये गॅस सिलेंडर घेण्यासाठी मोठ-मोठ्या रांगा लावल्या आहेत, अशातच पुण्यातही शिवाजीनगर भागातील गॅस एजन्सीच्या समोर नागरिकांनी गर्दी केली आहे.
घरगुती गॅसचा पुरवठा सुरळीत असल्याचं पुरवठा विभागाकडून सांगितलं जात असलं तरी गॅस एजन्सीच्या समोर लोकांची गर्दी पाहायला मिळत आहे. कारण नेहमीप्रमाणे मोबाईलच्या माध्यमातून गॅस सिलेंडर बुक करण्याचा प्रयत्न केला असता तो होत नाहीये असं लोकांचं म्हणणं आहे. त्याचबरोबर गॅस बुक होऊन अनेक दिवस झाल्यानंतर देखील गॅस घरी आला नसल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे.
तर शिक्षणासाठी पुण्यात राहणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. नोकरी करणारे बॅचलर देखील पुण्यात मोठ्या प्रमाणात आहेत. या सगळ्यांना जेवणासाठी आधार असतो तो खानावळींचा. मात्र गॅसच्या तुटवड्यामुळे या खानावळी बंद पडू लागल्यात. आज संध्याकाळपर्यंत पुरेल इतकाच गॅस उरल्याने अनेक विद्यार्थ्यांचे पैसे परत करावे लागत असल्याच खानावळी मालकांचं म्हणणं आहे.
मिठाईच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता
व्यवसायिक वापराच्या गॅस सिलेंडरच्या किमतीत वाढ झाल्यानं मिठाईच्या किमतीत वाढ करावी लागेल असं मिठाईच्या दुकानदारांचं म्हणणं आहे. पुण्यातील काका हलवाई मिठाई गॅसचा पुरवठा पुरेसा होत नसल्यानं मिठाईचे दुकानदार डिझेल किंवा इलेक्ट्रिक शेगड्यांचा पर्याय अवलंबत असले तरी गॅसचा पुरवठा पुरेसा होत नसल्याचा परिणाम व्यवसायावर होऊ लागल्याचं पुण्यातील काका हलवाई मिठाई दुकानाचे मालक युवराज गाढवे यांनी म्हटलं आहे.











































