कबुतरांमुळे तीव्र फुफ्फुसाचा आजार, दोन तासात सुरतहून फुफ्फुस आल्याने महिलेला जीवनदान…!

0
793

पुणे,दि.०९(पीसीबी) – सुरतमधील एका मेंदूमृत व्यक्तीमुळे पुण्यातील महिलेला जीवदान मिळाले आहे. या व्यक्तीची दोन्ही फुफ्फुसे विशेष विमानाने पुण्यात आणून त्यांचे प्रत्यारोपण करण्यात आले. यासाठी ग्रीन कॉरिडॉर तयार करण्यात आला होता. त्यामुळे अतिशय वेगाने ही सर्व प्रक्रिया पार पडून संबंधित महिलेचा जीव वाचू शकला. स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये हे प्रत्यारोपण झाले. एक ५३ वर्षीय महिला कबुतरांच्या संपर्कात आल्याने तीव्र फुफ्फुसाच्या आजाराने ग्रस्त होती. तिला २० सप्टेंबरला डीपीयू प्रायव्हेट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. श्वसनास त्रास होत असल्याने व्हेंटिलेटरची आवश्यकता भासू लागली. त्यामुळे तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

तिची प्रकृती खालावल्याने तिचे नाव दुहेरी फुफ्फुस प्रत्यारोपणासाठी अवयवप्राप्तीच्या प्रतीक्षा यादीत नोंदविले होते. रुग्णालयाला २८ सप्टेंबरला पुणे विभागीय अवयव प्रत्यारोपण समन्वय समितीमार्फत योग्य अवयवदाता उपलब्ध असल्याची माहिती मिळाली. सुरत जिल्हा रुग्णालयामध्ये ४२ वर्षीय मेंदूमृत पुरुषाच्या नातेवाइकांनी अवयवदानाचा निर्णय घेतला. सूचना मिळाल्यानंतर, डॉक्टरांचे पथक ताबडतोब सुरतला रवाना झाले. सुरतच्या जिल्हा रुग्णालयामधून २९ सप्टेंबरला दुपारी चारला अवयव काढण्यात आले आणि दोन तास १५ मिनिटांत संध्याकाळी सहा वाजून १५ मिनिटांनी पिंपरीतील डीपीयू प्रायव्हेट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले.

दरम्यान सुरतहून पुण्याला विशेष विमानाने ही फुफ्फुसे आणण्यात आली. यासाठी सुरतमधील जिल्हा रुग्णालय ते सुरत विमानतळ आणि नंतर पुणे विमानतळ ते डीपीयू प्रायव्हेट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल या मार्गावर ग्रीन कॉरिडॉर तयार करण्यात आला. सुरत आणि पुणे वाहतूक पोलीस विभागाच्या सहकार्याने ग्रीन कॉरिडॉर तयार करण्यात आला. त्यामुळे हे अवयव पुण्यात वेळेत पोहोचून त्याच दिवशी फुफ्फुस प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली.