कपड्याच्या दुकानदाराकडे मागितली खंडणी; तिघांवर गुन्हा दाखल

0
932

भोसरी, दि. १४ जुलै (पीसीबी) – कपड्याचे दुकान असलेल्या एका व्यावसायिकाकडे दुकानात येऊन तिघांनी खंडणी मागितली. याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना गुरुवारी (दि. 13) सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास भोसरी येथे घडली.

पिल्या राक्षे (वय 23), करण राठोड (वय 25), पत्या उर्फ प्रथमेश कांबळे (वय 20, सर्व रा. भोसरी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रोशन श्रीकृष्ण सिंग (वय 29, रा. धावडेवस्ती, भोसरी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे सखुबाई गवळी गार्डन जवळ कपड्यांचे दुकान आहे. फिर्यादी हे त्यांच्या दुकानात असताना त्यांच्या तोंड ओळखीचे आरोपी दुकानात आले. ‘इथे धंदा करायचा असेल तर आम्हाला हप्ते द्यायचे. फुकट कपडे द्यायचे’ असे बोलून पिल्या राक्षे याने कोयता काढून फिर्यादी यांना धाक दाखवला. ‘तुला माहिती नाही का, मी भोसरीचा भाई आहे. माझ्याकडे पैसे मागतोस’ असे म्हणून फिर्यादीच्या अंगावर कोयता मारण्यासाठी उगारला. फिर्यादी यांनी कोयत्याचा वार चुकवला. दरम्यान त्यांचा मावस भाऊ मध्ये आला असता आरोपींनी त्याला जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच कोयता उभारून दहशत माजवत आरोपी निघून गेले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. आरोपींच्या दहशतीला घाबरून परिसरातील नागरिक सैरावैरा पळू लागले. तसेच आजूबाजूच्या लोकांनी त्यांच्या दुकानांचे शटर बंद करून घेतले असल्याचे देखील फिर्यादीत म्हटले आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.