कपडे धुण्याच्या बहाण्याने बोलावून अल्पवयीन मुलीवर बलात्कार

0
388

पुणे, दि. १६ (पीसीबी) : सतरा वर्षीय मुलीला घरी कपडे धुण्याच्या बहाण्याने बोलावून घेऊन तिच्यावर बलात्कार केल्याची घटना हांडेवाडी येथे घडली. या प्रकरणात पोलिसांनी एकाविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. पीडित मुलीने लोणी काळभोर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. याप्रकरणी आरोपी सुदर्शन शेरमाळे (मूळ राहणार- मनमाड ,जिल्हा नाशिक) या आरोपीवर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात बलात्कार विनयभंग आणि पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.. हा प्रकार नोव्हेंबर महिन्यात तीन वेगवेगळ्या दिवशी घडल्याचे तक्रारीत नमूद आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मूळचा नाशिक जिल्ह्यातील मनमाड येथील आहे. तो नोकरी निमित्त पुण्यात स्थायिक झाला असून, हांडेवाडी परिसरात एकटा राहतो. आरोपीने पीडित मुलीला नोव्हेंबर महिन्यात त्याच्या घरी कपडे धुण्याचे काम करण्यासाठी बोलावले होते. त्यानंतर त्याने पीडित मुलीसोबत जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवले. हा प्रकार तीन वेळा घडला. अधिक तपास सहायक निरीक्षक जितेंद्र खैरनार करीत आहेत.

लष्कर भागात कामाला जाणाऱ्या अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून ‘माझे तुझ्यावर प्रेम आहे, तू पण प्रेमासाठी होकार दे,’ असा तगादा लावून आत्महत्या करण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात कोंढवा पोलिसांनी रमजान अब्बाज पटेल (वय १९ रा. शिवनेरीनगर, कोंढवा खुर्द) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. मुलगी आणि आरोपी एकाच परिसरात काम करतात. आरोपी काही दिवसांपासून मुलीचा वारंवार पाठलाग करत होता. ‘मला तू आवडतेस, तू माझ्यासोबत बोलली नाही तर मी आत्महत्या करेन’ अशी धमकी त्याने दिली होती. कोंढवा पोलिस तपास करीत आहेत.