नवी दिल्ली : कझाकिस्तानच्या अकातू विमानतळाजवळ अझरबैजानचे प्रवासी विमान कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यादुर्घटनेत मोठी जीवितहानी झाली असल्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. या विमानात क्रूसह 110 प्रवासी प्रवास करत होते. आतापर्यंत या दुर्घटनेत 70 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. या दुर्घटनेनंतरच्या व्हिज्युअल्स सोशल मीडियावर समोर आले आहे.
अझरबैजानची राजधानी बाकू येथून रशियातील गोन्झीकडे हे विमान मार्गस्थ झाले होते. मात्र दाट धुक्यामुळे विमान पक्ष्यांच्या थव्याला धडकले आणि पायलट इमर्जन्सी लॅडिंगचा प्रयत्न केला. यावेळी विमान अनियंत्रित झाले व कोसळले. अपघातानंतर विमानाचे तुकडेतुकडे झाले असून अनेक जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या अपघाताचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
घटनास्थळी बचावकार्य सुरु आहे. फुटलेल्या विमानाच्या अवशेषांमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. स्थानिक प्रशासन आणि आपत्कालीन सेवा दुर्घटनास्थळी पूर्णपणे तैनात आहेत.