वाकड, दि. 10 (प्रतिनिधी)
कचरा जमा करणाऱ्या ट्रकवरील चालकाने मद्य प्राशन करून ट्रक चालवून दोन वाहनांना धडक दिली. त्यामध्ये एका वाहनावरील व्यक्तीचा मृत्यू झाला. तर दुसऱ्या वाहनावरील व्यक्ती जखमी झाला आहे. ही घटना सोमवारी (दि. 9) दुपारी सव्वा चार वाजता ताथवडे येथे घडली.
अमोल चंदू फलके (वय 45, रा. रावेत) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. अक्षय दिगंबर गिरी (वय 20, रा. ताथवडे) असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. गिरी यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ट्रक चालक लोकेश रामे गौडा (वय 45, रा. घरकुल,चिखली) याला पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी लोकेश हा महापालिकेच्या कचरा गाडीवर चालक म्हणून काम करतो. फिर्यादी अक्षय गिरी त्यांच्या दुचाकीवरून भूमकर चौकाकडून ताथवडे बाजूकडे जात होते. त्यावेळी लोकेश याने मद्य प्राशन करून त्याच्या ताब्यातील कचरा गोळा करणारा ट्रक भरधाव चालवून अक्षय यांना धडक दिली. त्यामध्ये अक्षय यांच्या दुचाकीचे नुकसान झाले. तसेच त्यांच्या पायाला दुखापत झाली.
पुढे लोकेश याने त्याच्या ताब्यातील ट्रकने अमोल फलके यांच्या दुचाकीला धडक दिली यामध्ये फलके यांच्या दुचाकीचे मोठे नुकसान झाले. त्यात गंभीर जखमी होऊन फलके यांचा मृत्यू झाला. वाकड पोलीस तपास करीत आहेत.










































