कचरा गोळा करणाऱ्या पुणेकराला यूकेचा सर्वोच्च पुरस्कार

0
200

पुणे, दि. २२ (पीसीबी) : पुण्यातील विविध परिसरात असलेला कचरा पाहून पुण्यातील विवेक गुरव या तरुणाने 2019 मध्ये पुणे प्लॉगरची संकल्पना राबवली. त्यानंतर पर्यावरण संवर्धन आणि बदलते हवामान या विषयाचा अभ्यास करण्यासाठी त्याने लंडनमधील ब्रिस्टल विद्यापीठात प्रवेश घेतला. त्याच्या प्लाॅगिंगच्या संकल्पनेला युनायटेड किंगडमच्या पंतप्रधानांकडून देण्यात येणाऱ्या ‘पॉईंट ऑफ लाईट’ हा पुरस्कार जाहीर झाला आहे. जे लोक त्यांच्या समुदायात बदल घडवत आहेत त्यांना ‘पॉइंट्स ऑफ लाइट’ पुरस्कार दिला जातो. उत्कृष्ट वैयक्तिक स्वयंसेवकांना हा पुरस्कार मिळतो. प्लॉगरच्या संकल्पनेमुळे विवेक गुरव याने भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. युनायटेड किंगडमच्या भारतीय राजदूतांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे.

जयसिंगपूर येथील विवेक गुरव हा युवा तरुण युनायटेड किंग्डम (UK) येथील ब्रिस्टल विद्यापीठाचा विद्यार्थी आणि पर्यावरणवादी आहे. पुण्यातील MIT अभियांत्रिकी महाविद्यालयातून त्याने कम्प्यूटर इंजिनीअरींगचं शिक्षण पुर्ण केलं. त्यानंतर तो काही वर्ष IT मध्ये नोकरी करत होता. मात्र पुणे शहरातील विविध भागात फिरताना त्याला परिसरातील कचरा खुणावू लागला. कचरा साफ करणं फक्त पालिकेची जबाबदारी नसून सामान्य नागरिकांचीदेखील आहे हे समल्यावर त्याने 2019 मध्ये पुणे प्लॉगिंग नावाची संकल्पना राबवली. या उपक्रमात प्रत्येक शनिवार-रविवारी अनेक तरुणांना एकत्र आणत सकाळी फिरत, गाणे म्हणत आणि मजा करत कचरा गोळा करायला सुरुवात केली. दिवसभरात आपण किती कचरा करतो? याचा अंदाज घेतला. त्यानंतर या उपक्रमासाठी येणाऱ्या तरुणांची संख्या वाढत होती आणि शहरदेखील स्वच्छ होत होतं.