पिंपरी दि.२० (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड शहरातील घरोघरचा कचरा गोळा करणा-या गाड्यांवर जीपीएस यंत्रणा असूनही आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना याची माहिती मिळत नाही. त्यामुळे गाड्यांवर वॉच ठेवण्यासाठी आता महापालिकेतच कंन्ट्रोल रूम करण्यात येणार आहे.
पिंपरी-चिंचवड शहरातील घरोघरी घंटागाड्यांमार्फत कचरा गोळा करून हा कचरा मोशीतील कचरा डेपो येथे डम्पिंग केला जातो. शहरात सुमारे 1100 टन दररोज कचरा निर्माण होतो. यासाठी बीव्हीजी आणि ए. जी. एनव्हायरो या दोन ठेकेदारांची नेमणूक केली आहे. या ठेकेदारांच्या घंटागाड्या, कॉम्पफॅक्टर आणि डंपरच्या माध्यमातून कचरा गोळा करण्यात येतो. मात्र, शहरातील अनेक भागात वेळेवर अथवा घंटागाड्या येत नसल्याच्या तक्रारी येत आहे. या सर्व गाड्यांना व्हेईकल ट्रॅंकिंग मॅनेजमेनंट सिस्टीम आहे.
यावर नियंत्रण ठेवण्यासाठी दोन्ही ठेकेदारांनी दापोडीत एकाच ठिकाणी सेंन्ट्रल केले आहे. तसेच आरोग्य विभागातील काही अधिकाऱ्यांच्या मोबाईलवरही गाड्यांची माहिती मिळत आहे. मात्र, महापालिकेतील आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना याची माहिती मिळत नाही. त्यामुळे आरोग्य विभागाचे उपायुक्त अजय चारठणकर यांनी आता महापालिकेतच कंन्ट्रोल रूम करण्याचा निर्णय घेतला आहे.