कंपनीत चोरी करणाऱ्या एकास अटक

0
234

देहूरोड, दि. २४ (पीसीबी) – कंपनीमध्ये हे चोरी करणाऱ्या एकाला पोलिसांनी अटक केली. अटक केलेला चोरटा त्याच्या अन्य दोन साथीदारांसोबत मिळून विठ्ठलवाडी देहूगाव येथील अग्रवाल मेटल्स या कंपनीमध्ये ॲल्युमिनियमचे साहित्य चोरी करत होता. ही घटना मंगळवारी (दि. 23) रात्री दीड वाजताच्या सुमारास घडली.

सोनूकुमार श्रीराम सुंदर सरोज (वय 22, रा. विठ्ठलवाडी देहूगाव) यांनी याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तीन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील एकाला पोलिसांनी अटक केली आहे. दस्तगीर रशीद पठाण (वय 47, भोसरी. मूळ रा. लातूर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची देहूगाव विठ्ठलवाडी येथे अग्रवाल मेटल्स नावाची कंपनी आहे. मंगळवारी मध्यरात्री दीड वाजताच्या सुमारास आरोपी फिर्यादी यांच्या कंपनीत चोरी करण्यासाठी शिरले. दोघेजण कंपनीत गेले तर तिसरा कंपनीच्या बाहेर थांबून पाहणी करत होता. आरोपींनी 24 हजार रुपये किमतीचे ॲल्युमिनियमचे साहित्य चोरी करून नेले. हा प्रकार निदर्शनास येताच फिर्यादी यांनी आरोपींना अडवण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी फिर्यादी यांच्यावर दगडफेक करून साहित्य चोरून नेले. दरम्यान पोलिसांनी एकाला अटक केली आहे. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.