कंपनीतून 13 लाख 75 हजारांचे धातूचे पार्ट चोरून नेणाऱ्या कामगारास अटक

0
192

महाळुंगे, दि.२७ (पीसीबी)- कंपनीमध्ये काम करणाऱ्या एका कामगाराने कंपनीतून वेगवेगळ्या धातूंचे 13 लाख 75 हजार 500 रुपये किमतीचे पार्ट चोरून नेले. ही घटना 19 ते 21 मे या कालावधीत बोरा मोबिलिटी एलएलपी या कंपनीत घडली. या प्रकरणी पोलिसांनी कामगाराला अटक केली आहे.

अतिराज उर्फ बबलू राम मधाळे (वय 32, रा. लातूर) असे अटक केलेल्या कामगाराचे नाव आहे. याप्रकरणी अभय यादवराव बनसोडे (वय 28 रा. कोयनानगर, ता. हवेली) यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अतिराज हा फिर्यादी यांच्या कंपनीत काम करतो. त्याने कंपनीतून टीटानियम, ॲल्युमिनियम, क्रोमियम, झिरकॉनी आदी धातूंचे 13 लाख 75 हजार 500 रुपये किमतीचे 131 पार्ट चोरून नेले. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर फिर्यादी यांनी पोलिसात तक्रार दिली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. महाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.