कंपनीतील सुरक्षारक्षकांनी पळवले सव्वा दोन लाखांचे साहित्य

0
293

माण, दि. २७ जुलै (पीसीबी) – कंपनीमध्ये सुरक्षारक्षक म्हणून काम करणाऱ्या तिघांनी सव्वादोन लाखांचे साहित्य चोरून नेले. पोलिसांनी तिन्ही चोरट्यांना अटक केली आहे. ही घटना फेब्रुवारी ते 23 जुलै 2023 या कालावधीत माण येथे घडली.

प्रशांत सुदाम घोडे (वय 25, रा. चिंचोली, ता. भूम. जि. धाराशिव), पांडुरंग ईश्वर साबळे (वय 21, रा. माण, ता. मुळशी), दीपक मारुती क्षीरसागर (वय 34, रा. धर्मपुरी, ता. परळी, जि. बीड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी प्रोजेक्ट मॅनेजर महेश एकनाथ अनुभुले (वय 51, रा. पाषाण) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे फिर्यादी यांच्या कंपनीत सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होते. त्यांनी सहा महिन्यांच्या कालावधीत कंपनीतून एमसी पाईपलाईनचे कॅम्प, चार टन वजनाचे स्टील, ऍल्युमिनियमचे बारा स्क्वेअर मीटरचे पॅनल असे एकूण दोन लाख 25 हजारांचे साहित्य चोरून नेले. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर याबाबत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.