कंपनीच्या ग्राहकाचा युजर आयडी वापरून त्याने अमेरिकेतील मित्रासाठी मागवले 14 मोबाईल

0
197

पुणे, दि.२७ (पीसीबी)- कंपनीत काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने कंपनीच्या एका ग्राहकाचा युजर आयडी आणि पासवर्ड वापरून अमेरिकेतील दोन मित्रांसाठी 14 मोबाईल फोन ऑर्डर करत साडेआठ लाखांची फसवणूक केली. हा प्रकार पंधरा ते अठरा एप्रिल या कालावधीत बावधन येथे घडला.

अनिल रवींद्र गाडे (वय 43, रा. पाषाण, पुणे) यांनी या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार योगेश विजय वनवारी (वय 26, रा. पिंपळे सौदागर) आणि त्याचा अमेरिकेतील साथीदार विल्यम कोल आणि अज्ञात व्यक्ती यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी योगेश वनवारी हा फिर्यादी यांच्या कंपनीत काम करतो. योगेश याने फिर्यादी यांच्या कंपनीचे ग्राहक कॅथी व कॅरी थॉमसन यांचे युजर आयडी व पासवर्ड वापरून बेकायदेशीरपणे 14 मोबाईल फोन ऑर्डर केले. हे मोबाईल फोन अमेरिकेतील अज्ञात पत्त्यावर मागवले. त्यानंतर योगेश याचे अमेरिकेतील दोन साथीदार यांनी ते मोबाईल फोन विकून फिर्यादी यांच्या कंपनीची साडेआठ लाखांची फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी योगेश याला अटक केली आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.