कंपनीची गोपनीय माहिती स्पर्धक कंपन्यांना पुरविल्याबाबत दोन कर्मचाऱ्यांवर गुन्हा

0
89

वाकड, दि. ६ (पीसीबी)

कंपनीची गोपनीय माहिती स्पर्धक कंपन्यांना पुरविल्याबाबत कंपनीतील दोन कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार एक नोव्हेंबर 2021 ते 5 ऑक्टोबर 2024 या कालावधीत वाकड येथे घडला.

उदय अविनाश भांगे (रा. बावधन, पुणे), श्रीकांत अय्यंगर (रा. रास्ता पेठ, पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्या कामगारांची नावे आहेत. याप्रकरणी योगेश विद्याधर करंदीकर (वय 49, रा. रहाटणी, पुणे) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी उदय आणि श्रीकांत हे फिर्यादी यांच्या कंपनीत काम करतात. त्यांनी कंपनीची महत्त्वपूर्ण माहिती त्यांच्या स्पर्धक कंपन्यांना पुरवली. तसेच कंपनीचे आर्थिक नुकसान करण्याच्या उद्देशाने तिसऱ्या कंपनीसोबत सुरू असलेल्या वाटाघाटी होऊ नये यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले. त्यामध्ये कंपनीचे आर्थिक नुकसान झाले. कंपनीने आरोपींना कामासाठी विश्वासाने दिलेले लॅपटॉप, मोबाईल ज्यामध्ये कंपनीचा अत्यंत गोपनीय डाटा आहे, तो परत न देता त्याचा अपहार केला असल्याचे फिर्यादीत नमूद आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.