कंपनीची गोपनीय माहिती स्पर्धक कंपन्यांना देत कोट्यवधींची फसवणूक चार कामगारांवर गुन्हा दाखल

0
215

सांगवी ,दि. ११ (पीसीबी) –   कंपनीतील कामगारांनी कंपनीची गोपनीय माहिती स्पर्धक कंपन्यांना देऊन कंपनीची फसवणूक केली. तसेच कंपनीच्या साहित्यात बिघाड करून दीड कोटी रुपयांचे नुकसान केले. याप्रकरणी चार कामगारांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार सन २०१७ ते १० एप्रिल २०२३ या कालावधीत सांगवी परिसरात घडली.

रवींद्र शंकर जाधव (रा. पिंपळे गुरव), अभिषेक संजय जोशी (रा. औरंगाबाद), जयंत सुरेंदर त्रेहान (रा. चंदिगढ), इंद्रजित लाल सिंग (रा. चंदिगढ) अशी गुन्हा दाखल झालेल्या कामगारांची नावे आहेत. याप्रकरणी मुकेश गोपाळ शर्मा (वय ५०, रा. नवी सांगवी) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी कंपनीचे नोकर म्हणून काम करत असताना कट रचून कंपनीचे प्रात्यक्षिक देण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या साहित्यात बिघाड करून कंपनीचे दीड कोटी रुपयांचे नुकसान केले. आरोपी इंद्रजित याने ऑफिस मधील साहित्य चोरून नेले. कंपनीने कामासाठी दिलेले लॅपटॉप, मोबाईल फोन असे साहित्य काम सोडून जाताना परत न देता त्यातील माहिती चोरून ती माहिती स्पर्धक कंपन्यांना देऊन कोट्यवधी रुपयांच्या टेंडरचे नुकसान केले. कंपनीच्या ग्राहकांना कंपनी बंद झाल्याची चुकीची माहिती दिली. कंपनीच्या वेबसाईट मध्ये छेडछाड कडून फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.