कंपनीची गोपनीय माहिती प्रतिस्पर्धी कंपनीला विकली; कंपनीचे 30 कोटींचे नुकसान

0
381

कुरुळी, दि. १६ (पीसीबी) – कंपनीत काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनी कंपनीतील गोपनीय माहिती प्रतिस्पर्धी कंपनीला विकून कंपनीचे सुमारे 30 कोटींचे नुकसान केले. याप्रकरणी कंपनीचे असिस्टंट मॅनेजर, प्रोडक्शन मॅनेजर आणि डेप्युटी मॅनेजर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार सन 1996 पासून सन 2023 या कालावधीत कुरुळी येथील कल्याणी मॅक्सिवॉन व्हील्स प्राइवेट लिमिटेड या कंपनीमध्ये घडला.

याप्रकरणी नरेंद्र अर्जुनराव पाटील (वय 57) यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार असिस्टंट मॅनेजर सचिन छबीनदास सुरवडे, ऑपरेशन प्रोडक्शन मॅनेजर अरुण हनुमंत चिखले, डेप्युटी मॅनेजर संजीव अण्णाप्पा निंगनुरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे फिर्यादी यांच्या कंपनीत काम करत असताना त्यांच्याकडे विश्वासाने सोपविलेल्या कंपनीच्या व्यवसाय संदर्भातील गोपनीय माहितीचा त्यांनी अपहार केला. त्या माहितीचा वापर परस्पर स्वतःच्या मेल आयडीवर पाठवून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी केला. ही माहिती आरोपींनी फिर्यादी यांची प्रतिस्पर्धी असलेल्या स्टील स्ट्रिप्स व्हील्स लिमिटेड चेन्नई या कंपनीला विकला. यामुळे फिर्यादी यांच्या कंपनीचे साधारणतः 30 कोटी रुपयांचे नुकसान झाले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. महाळुंगे पोलीस तपास करीत आहेत.