कंत्राट देण्याच्या बहाण्याने पाच लाखांची फसवणूक

0
205

पिंपरी दि. २५ (पीसीबी) – कंपनीतील माजी कर्मचाऱ्याने हिमाचल प्रदेश येथील एका कंपनीच्या इन्स्टॉलेशनचे काम देण्याच्या बहाण्याने तिघांसोबत मिळून एका व्यावसायिकाची पाच लाख रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार जानेवारी ते 24 सप्टेंबर 2022 या कालावधीत पूर्णानगर, चिंचवड आणि हिमाचल प्रदेश येथे घडली.

प्रकाशचंद्र पशुपती मंडल (वय 50, रा. पूर्णानगर, चिखली) यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार शबा रशीद उर्फ करीम खान (रा. नसवानपूर, जि. कानपुर, उत्तर प्रदेश), अनिल ठाकूर, सुरेश धर्मानी, चांद राकेश (तिघे रा. हिमाचल प्रदेश) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची बिजयंता इंटरप्रायजेस नावाची फर्म आहे. त्याद्वारे ते फूड प्रोसेसिंग, ऍग्रो प्रोसेसिंगचे फॅब्रिकेशन मशीन बसविण्याचे काम करतात. आरोपी शबा हा फिर्यादीकडे काही दिवस काम करत होता. त्याने काम सोडून दिल्यानंतर त्याने फिर्यादींसोबत संपर्क करून नवीन काम मिळवून देण्याचे आमिष दाखवले. अनिल ठाकूर, सुरेश धर्मानी यांची स्काय हिट अँड इंजिनिअरिंग, बट्टी, ता. नालागर, जि. सोलण, हिमाचल प्रदेश ही कंपनी अस्तित्वात नसताना या कंपनीच्या फूड प्रोसेसिंग प्रोजेक्टचे इन्स्टॉलेशनचे फिर्यादींच्या कंपनीला काम दिले. त्यामुळे फिर्यादींनी आरोपी चांद राकेश याच्या एस पी ट्रेडर्स या कंपनीकडून कच्चा माल घेण्यासाठी पाच लाख रुपये दिले. आरोपींनी संगनमत करून या पैशांचा अपहार करून फसवणूक केली. चिखली पोलीस तपास करीत आहेत.