कंत्राट देणाऱ्या कंपनीची २० कोटी ४४ लाख रुपयांची फसवणूक, एकास अटक

0
382

कंपनी निर्मितीच्या कामाचे कंत्राट दिलेल्या कंपनीकडून कोट्यवधी रुपये घेऊन प्रत्यक्ष काम न करता रकमेचा अपहार करून २० कोटा ४४ लाख रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी फसवणूक करणाऱ्या कंपनीच्या तीन संचालकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार २१ सप्टेंबर २०१६ ते ४ एप्रिल २०२४ या कालावधीत रहाटणी आणि आसाम येथे घडला.

धवल डिस्टील इव्याप प्रा ली या कंपनीचे संचालक रवींद्र भास्कर जयवंत, संजीव रमेश राजे आणि एका महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी टॉम्सा डिस्टील इंडिया प्रा ली कंपनीचे बिजनेस डेव्हलपमेंट डायरेक्टर संदीप अशोक बनसुडे (वय ३५, रा. भोसरी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

आर्थिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार, टॉम्सा डिस्टील इंडिया प्रा ली या कंपनीला आसाम बायो रिफायनरी प्रा ली या कंपनीकडून बांबू पासून बायो इथेनॉल निर्मिती प्रकल्पातील फर्मेंटेशन आणि इव्हॅपोरेशन या दोन सेक्शन उभारणीचे कंत्राट मिळाले होते. धवल डिस्टील इव्याप प्रा ली या कंपनीचे संचालक आरोपींनी ते सब कंत्राट टॉम्सा कंपनीकडून घेतले.

त्यासाठी टॉम्सा कंपनीकडून धवल डिस्टील इव्याप कंपनीने २६ कोटी २८ लाख १३ हजार ६५२ रुपये घेतले. त्यातील ५ कोटी ८३ लाख ३१ हजार ९८२ रुपयांचे मटेरियल आणि प्रकल्प उभारणीचे कामकाज करण्यात आले. उर्वरित २० कोटी ४४ लाख ८१ हजार ६७० रुपये आरोपींनी कंपनीच्या आणि स्वतःच्या फायद्यासाठी वापरले. खोट्या पर्चेस ऑर्डर दाखवून २० कोटी ४४ लाख ८१ हजार ६७० रुपयांची टॉम्सा डिस्टील इंडिया कंपनीची फसवणूक केली.

याप्रकरणी टॉम्सा डिस्टील इंडिया कंपनीने पिंपरी-चिंचवड आर्थिक गुन्हे शाखेकडे धाव घेत तक्रार नोंदवली. आर्थिक गुन्हे शाखेने याबाबत वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून आरोपी रवींद्र भास्कर जयवंत याला अटक केली आहे. आर्थिक गुन्हे शाखेकडून या प्रकरणाचा तपास केला जात आहे.