कंत्राटी कामगारांना दिवाळीपूर्वी बोनसची रक्कम द्या; भाजप कामगार आघाडीची मागणी

0
210

पिंपरी, दि. २० (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रत्येक विभागाला कळवून कंत्राटदारांना त्यांच्या कर्मचा-यांना दिवाळीपूर्वी बोनसची रक्कम अदा करण्याचे आदेश देण्याची मागणी भाजप कामगार आघाडीने महापालिकेकडे केली आहे.भाजप कामगार आघाडीचे प्रदेश सरचिटणीस हनुमंत लांडगे, सदस्य दिपक गळितकर यांनी आयुक्त शेखर सिंह यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, महापालिकेने विविध विभागात ठेकेदारी करार पद्धतीने जवळपास 10 हजार पेक्षा जास्त कंत्राटी कामगारांची नेमणूक केलेली आहे.

या कामगारांना पालिकेने करारानुसार दरमहाच्या पगारातून किमान वेतन कायद्यानुसार दरमहा 8.33 टक्के बोनसची रक्कम अदा केला जातो. परंतु, प्रत्येक ठेकेदार त्या कर्मचा-यांना दरमहा तो मिळणारा बोनस दरमहा देत नाही. ही बोनस रक्कम दिवाळीसाठी राखून ठेवली जातो. परंतु, प्रत्येक ठेकेदार तो बोनस कामगारांना देईलच असे होत नाही.

त्यामुळे आपण प्रत्येक विभागाला कळवून कंत्राटदारांना त्यांच्या कर्मचा-यांना दिवाळीपूर्वी बोनसची रक्कम अदा करण्याचे आदेश द्यावेत. तसेच कंत्राटी कामगारांच्या सेवा-शर्तींबाबत झालेल्या कराराचे पालन व्हावे. कंत्राटी कामगारांना बोनस अदा केल्याबाबतचा सविस्तर पूर्तता अहवाल उलट टपाली मिळावा, अशी मागणी केली.