चाकण, दि. 29 (पीसीबी) : भरधाव वेगातील कंटेनरने टेम्पोला धडक दिली. या अपघातात टेम्पोतील दोघांचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (दि. २७) दुपारी तीन वाजताच्या सुमारास चाकण शिक्रापूर रस्त्यावर मोहितेवाडी येथे घडली. चेतन शालीकरम अहिरे (वय २४) आणि गणेश मास्ती पानसरे (वय ४२, रा बहुळ) अशी अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांची नावे आहेत.
अमन जालीग्राम अहिरे (वय २७, रा. सद्गुरु फर्निचर जवळ, किसनाबाई लष्करे यांच्या खोलीत, कडाचीवाडी चाकण, ता खेड, जि. पुणे. मूळ रा. धोनखेड, ता. मोताडा, जि. बुलढाणा) यांनी गुरुवारी (दि. २८) याबाबत चाकरण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात कंटेनर चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात कंटेनर चालकाने त्याच्या ताब्यातील कंटेनर भरधाव वेगात चालविला. वाहतकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून महिंद्रा जितो टेम्पो (एमएच १२ एसएक्स १७२६) याला धडक दिली. यावेळी गाडीत बसलेले चालक चेतन अहिरे आणि त्याच्या बाजूला बसलेले गणेश पानसरे हे जखमी झाले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. तसेच आरोपी कंटेनर चालकाने टेम्पोचे नुकसान केले. अपघातानंतर पोलिसांना माहिती न देता तसेच जखमींना उपचारासाठी न नेता कंटेनर चालक पळून गेला. चाकण पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.












































