कंगना म्हणते… कोणतीही नवीन हिरोईन आली की तिला दाऊदपुढे…

0
156

अभिनेत्री कंगना रणौत तिच्या रोखठोक वक्तव्यांसाठी कायमच ओळखली जाते. सध्या कंगनाला भाजपाने मंडी या हिमाचलमधल्या मतदारसंघातून तिकिट दिलं आहे. कंगना रणौत मंडीमध्ये प्रचार करते आहे. तसंच ती राहुल गांधींवरही टीका करताना दिसते आहे. अशातच एका मुलाखतीत कंगनाने दाऊद आणि बॉलिवूडच्या कनेक्शनवर भाष्य केलं आहे. तिचा हा दावा चांगलाच खळबळजनक आणि धक्कादायक आहे यात शंकाच नाही.

“पंतप्रधान नरेंद्र मोदींचा खूप प्रभाव पडतो. कारण ते अनेक लोकांसाठी प्रेरणास्थान आहेत. लोक त्यांची पूजा करतात. लोक त्यांना देव समजतात कारण त्यांना तसं वाटलं तर आतिशोयोक्ती होणार नाही.” असं कंगनाने म्हटलं आहे.

“मला लोक कायम एक प्रश्न विचारतात की तुला अभिनेत्रीच व्हायचं होतं का? मी त्यांना सांगते की माझं असं काहीही स्वप्न नव्हतं. मी असं काहीतरी करु इच्छित होते जे मनाला पटेल. मी रंगमंचावर काम केलं, सिनेमात काम केलं. मात्र मी एकाही खान आडनाव असलेल्या व्यक्तीबरोबर काम केलं नाही. मी आयटम साँग्स कधीच केले नाहीत. कारण माझ्या मनाला ते पटलं नाही. भाजपा याच पक्षाची निवड केली कारण मला या पक्षाची विचारधारा पडते. २०१९ मध्येही मला विचारणा झाली होती. मात्र तेव्हा मी लढण्याचा निर्णय घेतला नाही.” असंही कंगनाने म्हटलं आहे.

काँग्रेस देशविरोधी पक्ष असल्याचा आरोप कंगनाने केला. त्यांनी देशाची येणारी पिढी संपवली. एकीकडे भाजपा राष्ट्रवाद घेऊन देशात प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत आहे. तर दुसरीकडे काँग्रेस धर्मनिरपेक्ष मतांच्या नावाखाली देशाचे विभाजन करण्याचे काम करत असल्याचा धक्कादायक आरोप कंगनाने केला. भाजपा पुन्हा केंद्रात आल्यास संविधान बदलेल, या देशातील मुस्लिम असुरक्षित होतील, देशात पुन्हा निवडणुका होणार नाहीत, असा खोटा प्रचार काँग्रेसने सुरू केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह आणि भाजपच्या सर्व बड्या नेत्यांनी मोदीजींच्या नेतृत्वाखाली सर्वांचा विकास होईल, अशी ग्वाही देशाला दिली आहे, मात्र काँग्रेस खोटे आणि द्वेषाचे राजकारण करत असल्याचे कंगनाने म्हटलं आहे. एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत तिने हे वक्तव्य केलं आहे. अशात तिने बॉलिवूड आणि दाऊदच्या कनेक्शनवरही भाष्य केलं आहे.

सिनेसृ्ष्टीचा अर्थ म्हणजे नवी हिरोईन आली की आधी तिला दाऊदला सलाम करावा लागत असे. ही गोष्ट काही लपून राहिलेली नाही. मी ८० च्या दशकात जन्मले आहे, त्या काळातल्या सगळ्या अभिनेते, अभिनेत्रींचे फोटो दाऊदबरोबर आहेत हे पाहायला मिळतं. डॉनला एखादी मुलगी आवडली तर तिला तो घेऊन जातो. कुठल्या कुठल्या अभिनेत्रींसह हे घडलं आहे हे सगळ्यांनाच माहीत आहे. मोनिका बेदी असेल किंवा इतर मी सगळी नावं घेणार नाही पण हे सगळ्यांनाच ठाऊ आहे. माझ्या आई वडिलांसमोर हे सगळं चित्र होतं. मी सिनेक्षेत्रात जायचा निर्णय घेतला तेव्हा त्यांना धक्काच बसला. तू त्या क्षेत्रात गेलीस तर आम्ही आत्महत्या करु असंही मला आई वडील म्हणाले होते. पण या सगळ्या गोष्टींमध्ये बदल झाला आहे. हा बदल २०१४ पासून झाला आहे.