औंध, बाणेर, बालेवाडी, पाषाण, सुस, महाळुंगे, बोपोडी परिसरात राजकीय नेत्यांना बंदी

0
383

पुणे, दि. ३० (पीसीबी) – सकल मराठा समाज, मराठा क्रांती मोर्चा औंध, बाणेर, बालेवाडी, पाषाण, सुतारवाडी, सोमेश्वरवाडी, सुस, महाळुंगे, बोपोडी, छत्रपती शिवाजी महाराज नगर मधील मराठा समाजाच्या वतीने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक येथे उद्यापासून (मंगळवार) ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. या परिसरात राजकीय नेत्यांना गाव बंदी जाहीर करण्यात आली आहे.

मराठा समाजाच्या मागण्यांसाठी जालना अंतरवली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांचे पुन्हा उपोषण सुरू आहे. या मागण्यांना पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाज, मराठा क्रांती मोर्चा यांच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. प्रत्येक गावातील मराठा समाजाचा नागरिक या आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी गावातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला साक्ष ठेवून सहभागी होईल असे आवाहन करण्यात आले आहे. या गावांमध्ये मराठा समाजाच्या वतीने सर्वच राजकीय नेत्यांना गाव बंदी जाहीर करण्यात आली असून मराठा समाजाच्या भावनांचा व मागण्याचा विचार करून सर्वच राजकीय नेत्यांनी राजकीय कार्यक्रम टाळावेत. राजकीय नेत्यांना बोलवून कार्यक्रम घेऊ नये असे आवाहन करण्यात आले आहे.