अतिरिक्त परिवहन आयुक्त भारत कळसकर यांच्यासोबत १४ प्रमुख संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक संपन्न
मुंबई, दि. २२ – ओला, उबेर, रॅपिडो यांसारख्या ॲप-आधारित प्रवासी वाहतूक सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांकडून ऑटो, टॅक्सी आणि कॅब चालकांचे होणारे आर्थिक शोषण थांबवण्यासाठी आणि त्यांच्या भाडेवाढीच्या मागणीवर सकारात्मक तोडगा काढण्यासाठी आज परिवहन आयुक्त कार्यालयात एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.
अतिरिक्त परिवहन आयुक्त भारत कळसकर यांच्यासोबत झालेल्या या बैठकीत १४ प्रमुख संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
सायंकाळी ५ वाजता मुंबईतील परिवहन आयुक्त कार्यालयात झालेल्या या बैठकीत ऑटो टॅक्सी ट्रान्सपोर्ट फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बाबा कांबळे, ज्येष्ठ कामगार नेते उदयजी आंबोणकर, महाराष्ट्र ॲप बेस युनियन अध्यक्ष प्रशांत उर्फ बंटी सावडेकर, मा साहेब कॅब संघटना अध्यक्ष वर्षाताई शिंदे पाटील, महाराष्ट्र राज्य कामगार संघ ॲप बेस ट्रान्सपोर्ट युनियनचे अध्यक्ष रिजवान शेख, महाराष्ट्र टुरिस्ट टॅक्सी संघटना अध्यक्ष बिरुदेव पालवे, मनसे वाहतूक विभागाचे प्रतिनिधी, तसेच इतर १२ संघटनांचे प्रतिनिधी असे एकूण १४ संघटनांचे प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित होते.
अतिरिक्त परिवहन आयुक्त भरत कळसकर यांनी ओला, उबेर, रॅपिडो आणि इतर संबंधित कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत स्वतंत्रपणे चर्चा केली. ओला, उबेर चालकांचे भाडे दर वाढवण्या संदर्भात या कंपन्यांकडून लेखी म्हणणे मागवण्यात आले असून, ते आज बुधवार, दिनांक २३ जुलै रोजी प्राप्त होताच संघटनांसमोर हा प्रस्ताव ठेवून त्यांना लेखी कळवले जाईल, असे भारत कळसकर यांनी सांगितले.
परिवहन मंत्री सरनाईक यांच्या आदेशानंतर कार्यवाहीला वेग
ऑटो टॅक्सी ट्रान्सपोर्ट फेडरेशन आणि महाराष्ट्र रिक्षा पंचायत राष्ट्रीय अध्यक्ष, कष्टकऱ्यांचे नेते डॉ. बाबा कांबळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने नुकतीच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची भेट घेतली होती. या बैठकीनंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ऑटो, टॅक्सी आणि कॅब चालकांच्या समस्यांचे निराकरण करण्याचे आदेश परिवहन आयुक्तांना दिले होते. याच आदेशानुसार, परिवहन विभागाने भाडेवाढीच्या मुद्द्यावर काम सुरू केले आहे. यामुळे आजची बैठक आयोजित करण्यात आली होती.
आजच्या बैठकीत ऑटो, टॅक्सी व कॅब चालक-मालकांच्या प्रमुख मागण्यांवर सखोल चर्चा झाली. यामध्ये शासनाने ठरवलेल्या दरापेक्षा कमी दरात ओला, उबेर, रॅपिडो या भांडवलदार कंपन्यांकडून बुकिंग स्वीकारले जाणे, चालकांचे आर्थिक शोषण आणि त्यामुळे निर्माण झालेले गंभीर आर्थिक प्रश्न यांचा समावेश होता. ऑटो, टॅक्सी आणि कॅब चालकांना सध्या गाडीचे हप्ते, कर्जाची परतफेड, कुटुंबाच्या उदरनिर्वाहासह मुलांच्या शिक्षणासारख्या अनेक आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर, चालक-मालकांच्या संघटनांनी सातत्याने भाडेवाढीची मागणी लावून धरली आहे. असे उदय आपण कर यांनी सांगितले,
आजच्या बैठकीत या मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाली असून, भाडेवाढीच्या दिशेने ठोस पाऊले उचलण्याचे आश्वासन परिवहन विभागाकडून देण्यात आले आहे. या चर्चेमुळे ऑटो, टॅक्सी आणि कॅब चालकांना दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे, असे मा साहेब कॅब संघटनेचे अध्यक्ष वर्षा शिंदे यांनी सांगितले.
“येत्या दोन दिवसांत प्रश्न न सुटल्यास मुंबई येथे पुणे, मुंबई, नाशिक, नागपूरसह सर्व संघटनांची बैठक बोलावून पुढील निर्णय ठरवण्यात येईल,” असे प्रशांत बंटी सावडेकर यांनी सांगितले.
या प्रश्नांवरती १५ तारखेपासून सुरू झालेले आंदोलन भरकटले असून, “आम्ही आंदोलनातून बाहेर पडून लोकशाही मार्गाने न्याय मागत आहोत. सरकारने लक्ष दिल्यामुळे आम्हाला नक्की न्याय मिळेल,” असे रिजवान शेख म्हणाले.