ओबीसी आरक्षण मागणारी ‘मराठा वनवास यात्रा’ पिंपरी चिंचवड शहरात दाखल

0
230

मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेडच्या वतीने भव्य स्वागत..

पिंपरी,दि.२७(पीसीबी) – तुळजापूर ते मंत्रालय मुंबई असा 500 किलोमीटर प्रवास करत ही यात्रा 06 जून रोजी मंत्रालयावर धडकणार आहे. 42% च्या ही पुढे तापमान गेले. अक्षरशः सूर्य आग ओकत आहे. अश्याही स्थितीत सव्वा तीनशे किलोमीटरचा टप्पा पूर्ण करत मराठा समाजाची वनवास यात्रा पिंपरी चिंचवड शहरात पोचली आहे. मराठा समाजाला 50% च्या आत ओबीसी मधूनच आरक्षण मिळाले पाहिजे. यासाठी तुळजापूर पासून मुंबई पर्यंत पायी चालत जाणारे हे आगळे वेगळे आंदोलन सध्या महाराष्ट्रात सुरू आहे.

गोणपाटाचे वस्त्र परिधान करून, मराठा बांधव वाटचाल करत आहेत. प्रभू श्रीरामचंद्र यांना 14 वर्षेच वनवास भोगावा लागला. परंतु मराठा समाजाला गेली अनेक दशके आरक्षणाच्या बाबत वनवास भोगावा लागत आहे. तो आरक्षणाचा सुरू असलेला वनवास मिटावा यासाठी ही मराठा वनवास यात्रा असल्याचे आयोजक श्री योगेश केदार यांनी सांगितले.

तुळजापूर ते मुंबई च्या वाटेत लागणाऱ्या प्रत्येक शहरात आणि गावोगावी सभा बैठका घेत आरक्षण म्हणजे नेमके काय? संविधानात तरतुदी काय आहेत? राज्य कर्त्यानी नेमकी फसवणूक कशी केली? यापुढे मराठा समाजाची नेमकी भूमिका काय असावी? याबाबत जनजागृती केली जात आहे.अशी माहिती प्रताप सिंह कांचन, सुनील नागणे व सहकाऱ्यांनी दिली.

त्याचाच एक भाग म्हणून पिंपरी चिंचवड शहरात आज मराठा सेवा संघ तसेच संभाजी ब्रिगेडच्या वतीने स्वागत करण्यात आले. यावेळी मराठा सेवा संघ उद्योग कक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश जाधव, संभाजी ब्रिगेड चे पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष सतीश काळे,ज्येष्ठ नागरिक कक्षाचे मोहन जगताप,मराठा सेवा संघाचे सुभाष देसाई, चंद्रकांत शिंदे,रमेश जाधव, संपत फरतडे जिजाऊ ब्रिगेडच्या सुलभाताई यादव यांनी स्वागत केले. तसेच जिजाऊंच्या प्रतीमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.इथून पुढे ही यात्रा तळेगाव दाभाडे मार्गे जुन्या घाटातून खोपोली मार्गे मुंबई मध्ये जाणार आहे. मराठा समाजाला ओबीसी मधूनच आरक्षण लागू होई पर्यंत मुंबई सोडणार नाही अशी ठाम भूमिका या मराठा वनवास यात्रेची आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात वातावरण चिघळण्याची शक्यता आहे.