ओबीसी आरक्षणावर जल्लोष करणाऱ्या भाजपाला महिलांनीच खडसावले, महागाईवर बोला म्हणत केली कोंडी

0
260

पुणे, दि. २१ (पीसीबी) – भारतीय जनता पक्षाच्या पुण्यातील नेत्यांना पुणेकरांच्या पुणेरी खाष्टपणाचा अनुभव आला. पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात संध्याकाळी हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाच आयोजन करण्यात आलं होतं.या कार्यक्रमासाठी म्हणून पुण्यातील नवी पेठेतील दोन महिला बालगंधर्व रंगमंदीर परिसरात आल्या होत्या. भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते ओबीसी आरक्षण मिळाल्याबद्दल बालगंधर्व रंगमंदीरासमोर आनंदोत्सव साजरा करण्याच्या तयारीत असल्याचे दिसले. झेंडे घेऊन बालगंधर्व परिसरात उभ्या असलेल्या या कार्यकर्त्यांकडे या महिलांनी मोर्चा वळवला आणि त्यांना महागाई, गॅस दरवाढ वगैरे प्रश्नांच काय अस विचारायला सुरुवात केली.

त्यावेळी भाजपच्य नेत्यांनी हा ओबीसी आरक्षणाचा विषय आहे. इथे महागाईचा मुद्दा आणू नका असे त्यांना समजावले मात्र पुण्यातील नवी पेठेत राहणाऱ्या या दोन महिला ऐकण्यास तयार नव्हत्या. त्यानंतर भाजप नेत्यांकडून या दोन महिला कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीकडून पाठवण्यात आल्याचा आरोप करण्यास सुरुवात झाली.

यावर या दोन महिलांनी आपण कोणत्याही पक्षाशी संबंधित नसून त्यांचे नाव आणि पत्ता सांगून खात्री करुन घ्या असं भाजप नेत्यांना सांगितलं. आपण नवी पेठेत राहणारे असून भाजपचेच मतदार आहोत पण महागाईचा मुद्दा आपण मांडायला नको का? असा या दोन महिलांचा सवाल होता. भाजप नेते आणि या दोन महिलांमधे बराचवेळ यावरुन तु तु मै मै झाली. अखेर तिकिट काढलेल्या हिंदी गाण्यांच्या कार्यक्रमाची वेळ झाली आणि या दोन महिलांनी बालगंधर्व रंगमंदीराचा रस्ता धरला. विद्या वाघ आणि मंजुषा आठवले या दोन महिलांची नावे आहेत.

सुप्रीम कोर्टाने आज ओबीसी आरक्षण जाहीर केलं. त्यामुळे शहरात अनेक ठिकाणी या निर्णयाचं स्वागत होताना दिसत आहे. भाजपकडून झेंडे लावून, पेठे भरवून आंनंदोत्सव साजरा केला. आरक्षणाने जरी सामान्यांचे अनेक प्रश्न सुटत असले तरी महागाई कायम आहे. दरवेळी अनेक पक्षांकडून महागाई विरोधात वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करण्यात येतं. यावेळी मात्र भाजपला मत देणाऱ्या दोन महिलांनीच महागाईवर संताप व्यक्त केला आहे.