पिंपरी, दि. ११ (पीसीबी)- आज बुधवार दि. ११/१०/२०२३ रोजी नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी जिल्हा क्रीडा अधिकारी , पुणे यांना लेखी निवेदन दिले असून प्रभागातील सार्वजनिक ठिकाणी बसविण्यात आलेल्या ओपन जीमच्या देखभाल दुरूस्तीच्या अभावाने झालेल्या दुरावस्थेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे .प्रभाग क्रमांक २८ मध्ये कोकणे चौक ते स्वराज गार्डन चौक दरम्यान शहराच्या वैभवात भर घालणारे असे लिनियर अर्बन गार्डन विकसित करण्यात आले आहे. सदर गार्डनमध्ये नागरिकांच्या करमणूक,मनोरंजन या सोबतच आरोग्य विषयक सुविधा म्हणून नागरिकांना व्यायाम करण्यासाठीआमदार निधीच्या सहायता निधीमधून ओपन जिम उपकरणे बसविण्यात आले आहे . परंतु गार्डनमध्ये बसविण्यात आलेले बरेचशे ओपन जिम उपकरणाची अवस्था अत्यंत बिकट झाली असून बरेचशे उपकरणे मोडकळीस आलेले आहेत तर काही पुर्णपणे तुटलेले आहेत. यामुळे परिसरातील नागरिकांना सदर ओपन जिमचा वापर करणे धोकादायक तसेच असुरक्षित वाटत आहे. अश्या तुटलेल्या किंवा बिकट अवस्थेत असलेल्या ओपन जिम मध्ये व्यायाम करतांना नागरिकांना दुखापत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नागरिकांच्या मानसिक आरोग्य प्रमाणेच शारीरिक आरोग्य सुदृढ ठेवण्याच्या उद्देशाने विकसित करण्यात आलेले ओपन जिमची संकल्पना या मोडकळलेल्या जिम उपकरणांमुळे साध्य होताना दिसत नाही.
म्हणून पिंपळे सौदागर परिसरातील लिनियरअर्बन गार्डनमध्ये बसविण्यात आलेल्या ओपन जिम उपकरणांची देखभाल दुरूस्ती विषयक कामे नियमितपणे करण्यात यावी तसेच तुटलेली उपकरणे लवकरात लवकर दुरुस्त करावे अशी मागणी नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी आपल्या लेखि निवेदनाच्या माध्यमातून जिल्हा क्रीडा अधिकारी , पुणे यांना केली आहे.