ऑल इंडिया उर्दू मुशायऱ्याला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

0
161

पिंपरी, दि.२(पीसीबी) – “उर्दू ही संपूर्ण हिंदुस्थानाची भाषा असून ती आम्हाला परंपरा आणि रीतिरिवाज शिकवते!” असे विचार बीना एज्युकेशनल सोसायटीचे संस्थापक – अध्यक्ष इक्बाल खान यांनी बीना इंग्लिश मीडियम स्कूल, पांढारकरनगर, आकुर्डी येथे व्यक्त केले. अमृतमहोत्सवी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून बीना एज्युकेशनल सोसायटीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ऑल इंडिया उर्दू मुशायऱ्याला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. बीना इंग्लिश मीडियम स्कूल, पांढारकरनगर, आकुर्डी येथे शनिवार, दिनांक २७ जानेवारी २०२४ आयोजित करण्यात आलेल्या या मुशायऱ्याला आमदार अण्णा बनसोडे, पिंपरी – चिंचवड महापालिका शहर सहअभियंता मनोज सेठीया, सामाजिक कार्यकर्ते जयदीप खापरे, सुशांत मोहिते, सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. झेड. के. फैझान, ॲड. सय्यद जलालुद्दीन, उद्योजक शौकत खान, बीना एज्युकेशनल सोसायटीचे संस्थापक – अध्यक्ष इक्बाल खान आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती

शमा (मेणबत्ती) प्रज्वलित करून मुशायऱ्याचा प्रारंभ करण्यात आला. सुरवातीला जिया बागपती यांनी सादर केलेल्या नात (भक्तिरचना) या काव्यप्रकाराला मिळालेली जोरदार दाद मैफल रंगतदार होणार ग्वाही देणारी ठरली.

“ख्वाबोंकी एक लाश अचानक बोल उठी
कितनी देर लगेगी दफनाने में”

अशा जोरदार शेरांची पेशकश करीत दिल्ली येथील सरिता जैन यांनी मैफलीत रंग भरायला सुरुवात केली; तर शाहिस्ता सना यांनी,

“मेरा मेहबूब हैं मजदूर मगर
उसने मुझे अपने कुटियां में
रानी की तरहा रखां हैं”

अशा शेरांनी प्रेमाची श्रीमंती अधोरेखित केली. सुहेल लखनवी यांनी,

“मेरी कमजोरी के पक्का नहीं होने देती
ये इरादा कोई पुख्खा नहीं होने देती”

अशा शब्दांत गरिबीने पिचलेल्या असहाय्य माणसाची वेदना व्यक्त केली. डॉ. मेहताब आलम यांनी मैत्री, ढोंग या भावना व्यक्त करणाऱ्या रचनांनी रसिकांना खिळवून ठेवले; तर हीना तैमुरी या ज्येष्ठ गझलकाराने,

“हमको तो चट्टानों में रास्ता बनाना हैं…”

अशा नेमक्या शब्दांत गहिऱ्या प्रेमाची वाट किती अवघड असते, हे श्रोत्यांच्या मनावर ठसवले. त्यांच्याच

“मैं उर्दू जबान हूं
हिंदी मेरी दिलकी धडकन…”

या रचनेतून उर्दूची महती सांगताना ती फक्त मुस्लिमांची नाही; तर संपूर्ण हिंदुस्थानाची बोलीभाषा आहे, हे ठामपणे मांडले. असलम चिश्ती यांनी यांत्रिकतेने माणुसकीवर केलेली मात आपल्या गझलेतून मांडली; तर आदिल रशीद यांनी हुंड्याअभावी मुलीचे लग्न करू न शकणाऱ्या बापाचे कारुण्य साकारले.

डॉ. अना देहलवी यांनी,

“बेटी हूं भारतकी…” या कवितेच्या प्रभावी सादरीकरणातून देशभक्तीची भावना उजागर केली.

“धूप को आजमा रहा हूं मैं
मोम का घर बना रहा हूं मैं”

अशा एकाहून एक सरस रचनांनी जौहर कानपुरी यांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले; आणि मैफल जिंकली. गुलाबी थंडी आणि उबदार शेरोशायरी यामुळे रसिकांना मैफल संपूच नये असे वाटत होते. त्यामुळे जोरदार दाद देतानाच वारंवार फर्माईशी येत होत्या. आवडत्या रचनांसाठी रसिक गझलकाराला पुष्पहार घालून प्रोत्साहन देत होते.

बीना एज्युकेशनल सोसायटीचे कोषाध्यक्ष हमजा खान, सरचिटणीस आजम खान, विश्वस्त मतलूब उस्मानी, अकमल खान, नदीम खान, अब्दुल्ला खान, राज अहेरराव, अश्विनी कुलकर्णी यांनी संयोजनात परिश्रम घेतले. मोईन शादाब यांनी मुशायऱ्याचे बहारदार सूत्रसंचालन केले. इक्बाल खान यांनी आभार मानले. भारताची एकात्मकता टिकून राहावी या उद्देशाने ७५ व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने बीना एज्युकेशनल सोसायटीतर्फे हा मुशायरा आयोजित करण्याचा तसेच देशभक्तिपर गझल सादरीकरणाद्वारे देशप्रेम जागृत करण्याचा उद्देश सफल झाला, अशी भावना रसिकांनी व्यक्त केली.