ऑल आऊट ऑपरेशनमध्ये सराईतांची धरपकड

0
297

शस्त्रांसह अंमली पदार्थही जप्त
पिंपरी, दि.२२ (पीसीबी) : पिंपरी-चिंचवड पोलिसांनी शनिवारी (दि. २१) मध्यरात्री बारा ते पहाटे पाच वाजताच्या कालावधीत ऑल आऊट ऑपरेशन, कोम्बिंग ऑपरेशन आणि नाकाबंदी करून गुन्हेगारांची धरपकड केली. यात पोलिसांना रेकॉर्डवरील गुन्हेगारांसह शस्त्रे आणि अंमली पदार्थही मिळून आले. तसेच नियमभंग करणाऱ्या वाहन चालकांवर देखील पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईमध्ये सर्व पोलीस स्टेशन, गुन्हे शाखांमधील ६६ पोलीस अधिकारी, ३५० पोलीस सहभागी झाले.

नाकाबंदी दरम्यान एक हजार ७९३ वाहने तपासण्यात आली. रेकॉर्डवरील व हिस्ट्रीशिटर ४११ आरोपी चेक केले. मोटार व्हेईकल अॅक्ट प्रमाणे १८५ वाहनांवर कारवाई करून दंड वसूल करण्यात आला आहे. १४४ संशयीत इसमांना चेक केले. अवघ्या पाच तासात १३७ हॉटेल, लॉज तपासले. पाहिजे आरोपी २९ चेक केले. त्यापैकी १४ आरोपींना अटक केली. मद्यपान करून वाहन चालवणाऱ्या २२ जणांवर ड्रंक अॅण्ड ड्राईव्ह प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ठरवून दिलेल्या वेळेपेक्षा जास्त वेळ हॉटेल सुरु ठेवणाऱ्या २१ हॉटेल चालकांवर खटले भरण्यात आले आहेत.

पोलिसांनी २१ तडीपार आरोपी चेक केले. मुंबई पोलीस कायदा कलम १२२ प्रमाणे १३ कारवाया केल्या. आठ लोखंडी कोयते, दोन तलवार, दोन सुरे अशी १२ हत्यारे जप्त करून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दारुबंदी कायदयाप्रमाणे सात कारवाया करण्यात आल्या. अजामीनपात्र सात वॉरंट बजावण्यात आले. सहा जणांना पकड वॉरन्ट बनवण्यात आले. संशयीत सहा वाहने ताब्यात घेण्यात आली. आठ प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आल्या. पाच फरारी, दोन मोक्का मधील आरोपींची तपासणी, एक तडीपार शहरात आढळून आल्याने त्याच्यावरही कारवाई करण्यात आली. गांजा विक्री प्रकरणी एकास अटक करून त्याच्याकडून आठ किलो ७०० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे.