ऑनलाईन टास्कच्या बहाण्याने तरुणाची 18 लाखांची फसवणूक

0
268

पिंपळे गुरव, दि. १९ (पीसीबी) – ऑनलाईन टास्क पूर्ण केल्यास भरपूर पैसे मिळतील, असे आमिष दाखवून एका तरुणाकडून टास्कच्या बहाण्याने 18 लाख 16 हजार रुपये घेत गंडा घालण्यात आला. हा प्रकार 11 ऑक्टोबर ते 27 ऑक्टोबर या कालावधीत पिंपळे गुरव येथे घडला.

याप्रकरणी 29 वर्षीय तरुणाने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखी इसमांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी यांना टेलिग्रामद्वारे ऑनलाईन टास्क दिले. ते टास्क पूर्ण केल्यास तुम्हाला जास्त पैसे मिळतील, असे आमिष दाखवले. टेलिग्रामवर एक लिंक पाठवून फिर्यादीस खाते उघडण्यास सांगितले. खाते उघडल्यानंतर फिर्यादीस टेलिग्राम ग्रुपमध्ये जॉईन करण्यात आले. ग्रुप चालवणाऱ्या पाच जणांनी मिळून फिर्यादीकडून वारंवार ऑनलाईन माध्यमातून टास्कच्या बहाण्याने 18 लाख 16 हजार 166 रुपये घेत त्यांची फसवणूक केली. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.