ऑनलाईन जॉब शोधता शोधता तरुणीने गमावले दीड लाख रुपये

0
271

पिंपरी, दि.26 (पीसीबी) -ऑनलाईन जॉब शोधत असताना आलेल्या एका लिंकवर जाऊन तिथे दाखवलेल्या आमिषाला बळी पडून तरुणीने दीड लाख रुपये गमावले. हा प्रकार 21 ते 23 एप्रिल या कालावधीत देहूफाटा, दिघी येथे घडला.

याप्रकरणी 20 वर्षीय तरुणीने दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार 6207884380 या क्रमांक धारक आणि टेलिग्राम वरील एका युजर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी घरी असताना तिने ऑनलाईन माध्यमातून जॉब शोधण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तरुणीला कमी कालावधीत चांगले पैसे कमावण्याची संधी असणारी एक लिंक आढळली. त्यावर जाऊन तरुणीने माहिती घेतली. क्रिप्टो करन्सी मध्ये गुंतवणूक केल्यास कमी कालावधीत अधिक नफा होईल, असे त्यात आमिष दाखविण्यात आले होते. सायबर गुन्हेगारांनी फिर्यादी तरुणीचा विश्वास संपादन करून तिला गुंतवणूक करण्यास भाग पाडले. तरुणीने तब्बल एक लाख 59 हजार रुपये गुंतवले. मात्र तरुणीला कोणताही नफा अथवा गुंतवलेली रक्कम मिळाली नाही. दिघी पोलीस तपास करीत आहेत.