ऑनलाइन शिक्षण पद्धतीमुळे उच्च शिक्षणापर्यंतचा खर्च सर्वसामान्यांच्या आवाक्यात – के. के. दवे

0
164

एएसएम मध्ये “इन्काँन २०२३” आंतरराष्ट्रीय परिषद संपन्न

पिंपरी,दि. ३१ (पीसीबी) कोरोनामुळे ठप्प झालेल्या अर्थव्यवस्थेला आता दुप्पट वेगाने गती मिळणार आहे. देशासह जगात सर्वत्र आता अनेक व्यवहार, शिक्षण ऑनलाईन पद्धतीने देण्यासाठी तंत्रज्ञान विकसित होत आहे. या ऑनलाइन शिक्षण पद्धतीचे योग्य पद्धतीने व्यवस्थापन केले तर प्राथमिक शिक्षणापासून उच्च शिक्षणापर्यंतचा खर्च सर्वसामान्यांच्या आवाक्यात येईल. यामुळे ग्रामीण भागात देखील उच्च तंत्रज्ञान शिक्षण पद्धती पोहोचण्यास मदत होईल यासाठी संगणक क्षेत्रातील विद्यार्थ्यांबरोबरच व्यवस्थापन शाखेतील विद्यार्थ्यांना देखील खूप मोठ्या संधी उपलब्ध होणार आहेत याचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन उदयपूर येथील पॅसिफिक विद्यापीठाचे कुलगुरु के. के. दवे यांनी केले.

औद्योगिक शिक्षण मंडळ चिंचवड (एएसएम) यांच्या वतीने आयोजित केलेल्या १६ व्या “इन्काँन २०२३” या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी डॉ. डि. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सायली गणकर आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे वाणिज्य शाखेचे अधिष्ठाता डॉ. पराग काळकर तसेच औद्योगिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष डॉ. संदिप पांचपांडे व सचिव डॉ. आशा पांचपांडे आदी उपस्थित होते. तसेच सायटस विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. स्कॉट वैन्जजिया, होप फॉवडेशेनचे अध्यक्ष डॉ. अरुणा कटारा, दक्षिण आस्टियातील युनिव्हर्सिटी ऑफ अपलायड सायन्सचे उप अध्यक्ष डॉ. अँडयुयर जेटनर, स्पर्श गोवल बिझनेसचे संस्थापक संचालक डॉ. रवीकुमार जैन, वरिष्ठ अभ्यासक श्रीहरी प्रसाद होनवाड, जोगीटी देवर, डॉ. फन कोटलर आणि डॉ. ख्रिस्तोफर अब्राहम, दुबई आणि सिध्दार्थ विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बाळकृष्ण शेट्टी यांनी ऑनलाईन पद्धतीने सहभाग घेऊन मार्गदर्शन केले.

स्वागत प्रास्ताविक करताना डॉ. संदीप पाचपांडे यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांना संशोधनामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे मार्गदर्शन आणि संधी मिळावी यासाठी या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. केंद्र सरकारच्या नवीन शैक्षणिक धोरणात संशोधन आणि ऑनलाईन पद्धतीने शिक्षण याला अनन्य साधारण महत्त्व प्राप्त होणार आहे.त्यामुळे शिक्षण, संशोधन व उद्योग क्षेत्रात योग्य समन्वय साधून रोजगार निर्मितीला चालना मिळेल आणि देशाच्या विकासात हातभार लागेल.या परिषदेमध्ये व्यवस्थापन, विपणन, वित्त, माहिती तंत्रज्ञान, कृषी, सामान्य व्यवस्थापन, बँकींग या विषयांवर ३११ संशोधन प्रबंध सादर करण्यात आले.तसेच विविध विषयावर जगातील तज्ञ मार्गदर्शक, उद्योजक यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.

समारोपप्रसंगी राजस्थानच्या संगम विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. करणेश सक्सेना यांनी संशोधनही सतत चालणारी प्रक्रिया असून नवीन शैक्षणिक धोरणात उपयुक्त बदल अपेक्षित आहेत. आय. टी., संगणक, व्यवस्थापन या विषयासाठी ऑनलाईन शिक्षण पद्धती उपयुक्त आहे. त्यामुळे ऊर्जा तसेच वेळेची बचत होऊन साधन संपत्तीत वाढ होईल. या संशोधनाचा उपयोग समाज हितासाठी झाला पाहिजे असे आग्रही मत प्रतिपादन केले.

आरोग्य शास्त्र संस्थेचे कुलगुरू डॉ. विष्णू मगरे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे विज्ञान शाखेचे अधिष्ठाता डॉ. मनोहर चासकर यांनी आपल्या भाषणात संशोधनाचा नेमका विषय निवडणे किती महत्त्वाचे आहे. हे सांगून माहिती व तंत्रज्ञान विषयातील अद्ययावत संशोधनाबाबत सातत्याने उपक्रम राबविणाऱ्या औद्यागिक शिक्षण मंडळाचा गौरव केला. विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी संस्थेमार्फत आंतरराष्ट्रीय पातळीवरील विविध उपक्रम राबविले जातात याविषयी संस्थेच्या सचिव डॉ. आशा पांचपांडे यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे समन्वय डॉ. सुधाकर बोकेफोडे, डॉ. सतिश पवार, डॉ. ललित कनोरे, डॉ. शाम माथुर, डॉ. व्ही.पी. पवार व डॉ. किरण जगताप यांनी विशेष परिश्रम घेतले. पराचार्य डॉ. दत्तात्रय बाळसराफ यांनी आभार मानले.