ऑनलाइन’ वीजबिल भरण्यासाठी वर्षभरात ग्राहकसंख्येमध्ये तब्बल ३ लाखांनी वाढ

0
128

‘ऑनलाइन’ वीजबिल भरणारे ७५ टक्के पुणेकर राज्यात अव्वल

पुणे, दि. १८ (पीसीबी) – महावितरणचे वीजबिल ‘ऑनलाइन’द्वारे भरण्यासाठी वीजग्राहकांचा दिवसेंदिवस प्रतिसाद वाढत आहे. पुणे परिमंडलात गेल्या एका वर्षात वीजबिलांचा ‘ऑनलाइन’ भरणा करणाऱ्या ग्राहकांची संख्या तब्बल ३ लाख ५ हजार ३०० ने वाढली आहे. सद्यस्थितीत लघुदाब वर्गवारीतील सरासरी २१ लाख ३८ हजार ३५० (७४.५ टक्के) घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक व इतर ग्राहक दरमहा सुमारे ५५९ कोटी रुपयांच्या वीजबिलांचा ‘ऑनलाइन’द्वारे घरबसल्या व सुरक्षितपणे भरणा करीत आहेत.

महावितरणच्या पुणे परिमंडलातील वीजग्राहकांनी ‘ऑनलाइन’ भरणा करण्यामध्ये राज्यात आघाडी कायम ठेवली आहे. लघुदाब वर्गवारीतील घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक व इतर सरासरी २८ लाख ७० हजार ९८९ ग्राहक दरमहा वीजबिल भरतात. त्यातील ७४.५ टक्के म्हणजे २१ लाख ३८ हजार ३४८ ग्राहक ‘ऑनलाइन’द्वारे वीजबिलांचा भरणा करीत आहेत. सन २०२२ च्या तुलनेत सन २०२३ मध्ये ‘ऑनलाइन’साठी ३ लाख ५ हजारांनी ग्राहकसंख्येत भर पडली असून भरण्याची रक्कम देखील १२९ कोटी रुपयांनी वाढली आहे.

पुणे शहरात गेल्या वर्षभरात ‘ऑनलाइन’साठी पसंती दिलेल्या ग्राहकांची संख्या १ लाख ४६ हजार ३०० ने वाढली असून भरण्याच्या रकमेत देखील ५९ कोटी ३१ लाख रुपयांनी भर पडली आहे. सद्यस्थितीत सरासरी ११ लाख ८० हजार १९१ (७३.६ टक्के) लघुदाब घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक व इतर ग्राहक दरमहा २९५ कोटी रुपयांच्या वीजबिलांचा ‘ऑनलाइन’ भरणा करीत आहेत.

पिंपरी चिंचवड शहरात सरासरी ७ लाख ४ हजार ७६३ लघुदाब वीजग्राहक दरमहा वीजबिलांचा भरणा करीत आहेत. त्यातील ५ लाख ६३ हजार ८५ (८० टक्के) ग्राहक ‘ऑनलाइन’द्वारे दरमहा १५१ कोटी ७६ लाख रुपयांचा भरणा करीत आहेत. सन २०२३ मध्ये या ग्राहकसंख्येत ८१ हजार १८० ने भर पडली असून ‘ऑनलाइन’ वीजबिल भरण्याची रक्कम ३५ कोटी ७४ हजार रुपयांनी वाढली आहे.

ग्रामीण भागातील आंबेगाव, जुन्नर, मावळ, खेड, मुळशी, वेल्हे, हवेली तालुक्यांमध्ये लघुदाबाच्या सरासरी ५ लाख ६३ हजार ३४४ पैकी ३ लाख ९५ हजार ७४ (७०.१ टक्के) वीजग्राहक ‘ऑनलाइन’द्वारे १११ कोटी ३५ लाख रुपयांच्या वीजबिलांचा भरणा करीत आहे. सन २०२३ मध्ये या ग्राहकसंख्येत ७७ हजार ८११ ने भर पडली असून भरण्याची रक्कम ३३ कोटी १५ लाख रुपयांनी वाढली आहे.

लघुदाब वीजग्राहकांनी क्रेडिट/ डेबीटकार्ड, यूपीआय, भीम, इंटरनेट बँकींग, मोबाईल वॉलेटदवारे ‘ऑनलाइन’ वीजबिल भरल्यास दरमहा ५०० रुपयांच्या मर्यादेत प्रत्येक महिन्याच्या वीजबिलामध्ये ०.२५ टक्के सूट देण्यात येत आहे. घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक व इतर लघुदाब ग्राहकांसाठी www.mahadiscom.in ही वेबसाईट व महावितरण मोबाईल अॅप उपलब्ध आहे. त्यात एकाच नोंदणीकृत खात्यातून स्वतःच्या एकापेक्षा अधिक कुठल्याही वीजजोडण्यांचे बिल ‘ऑनलाइन’ भरता येत आहे.

मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार, पुणे परिमंडल– महावितरणच्या आधुनिक जीवनशैलीशी सुसंगत ग्राहकसेवेमध्ये ‘ऑनलाइन’ सेवा अतिशय महत्वाची आहे. त्यास पुणेकरांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. ‘ऑनलाइन’ वीजबिल भरण्यासोबतच लघुदाब वर्गवारीतील ग्राहकांना ‘आरटीजीएस’ किंवा ‘एनईएफटी’द्वारे वीजबिल भरण्याची किमान ५ हजार रुपये करण्यात आली आहे. त्यानुसार ५ हजारांपेक्षा अधिक रुपयांच्या वीजबिलांवर महावितरणच्या बँक खात्याचा तपशील देण्यात येत आहे