ऑनलाइन गेममध्‍ये पैसे हरला; यूट्युब बघून वाहन चोरी शिकला

0
2

पिंपरी, दि. 16 (पीसीबी) : ऑनलाइन गेममध्‍ये एक तरुण पैसे हरला. त्‍याची भरपाई करण्‍यासाठी युट्यूब बघून वाहन चोरी करायला शिकला. चोरीतून मिळालेले पैसे पुन्‍हा ऑनलाइन गेममध्‍ये हरला. चाकण पोलीस सीसीटीव्‍ही फुटेज पाहत त्‍याच्‍या संगमनेर येथील घरापर्यंत पोचले. त्‍या चोरट्याकडून 26 लाख रुपयांच्‍या 18 दुचाकी हस्‍तगत केल्‍या.

अभय सुरेश खर्डे (वय 23, रा. झोळे, ता. संगमनेर, जि. अहमदनगर, सध्‍या रा. गुंजाळवाडी रोड, संगमनेर, जि. अहमदनगर) असे अटक केलेल्‍या चोरट्याचे नाव आहे. तसेच चोरीच्‍या गाड्या विक्रीसाठी मदत करणारे रविंद्र निवृत्‍ती गव्‍हाणे (वय 23, रा. आंजनापूर, ता. कोपरगाव, जि. अहमदनगर), शुभम बाळासाहेब काळे (वय 24, रा. कोळपेवाडी, ता. कोपरगाव, जि. अहमदनगर), यश नंदकिशोर थुट्‌टे (वय 22, रा. चिखली, जि. बुलढाणा. सध्‍या रा. अशोकनगर, नाशिक), प्रेम भाईदास देवरे (वय 20, रा. अशोकनगर, नाशिक) यांनाही पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींकडून चोरीच्‍या 26 लाख रुपयांच्‍या 18 दुचाकी हस्‍तगत केल्‍या.

150 सीसीटीव्‍ही फुटेजची केली पाहणी

पोलीस उपायुक्‍त डॉ. शिवाजी पवार यांनी दिलेल्‍या माहितीनुसार, चाकण पोलीस ठाण्‍याच्‍या हद्‌दीतून बुलेट चोरीला जाण्‍याचे प्रमाण वाढले होते. एका ठिकाणी चोरी झालेल्‍या बुलेटच्‍या शोधासाठी पोलीस 150 सीसीटीव्‍ही फुटेज पाहत संगमनेरपर्यंत पोहचले. तिथे आरोपी अभय खर्डे याला ताब्‍यात घेतले. त्‍याच्‍याकडे चौकशी केली असता त्‍याने चाकण आणि आसपासच्‍या परिसरातून 18 दुचाकी केल्‍याची कबुली दिली. तसेच चोरीच्‍या दुचाकी विकण्‍यासाठी त्‍याला मदत करणार्‍या चारही आरोपींना अटक केली. त्‍यांनी ग्रामीण परिसरात विकलेल्‍या चोरीच्‍या 18 बुलेट हस्‍तगत केल्‍या.

यूट्युबवरून शिकला चोरी

आरोपी अभय खर्डे हा एव्हीएटर ही ऑनलाइन गेम खेळत होता. यामध्‍ये तो तब्बल आठ ते दहा लाख रुपये हरला होता. हरलेले पैसे परत मिळविण्यासाठी त्‍याने चोरी करण्‍याचा निर्णय घेतला. युट्युबवर पाहून त्‍याने दुचाकी चोरी कशी करायची हे शिकला. बुलेटला किंमत मिळत असल्‍याने तो सहसा बुलेटच चोरी करीत असे. त्‍याच्‍या ताब्‍यातून 26 लाख रुपयांच्‍या 11 बुलेट, सहा स्‍पेंडर, व एक यामाहा दुचाकी हस्‍तगत केल्‍या.

ही कामगिरी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह आयुक्त शशिकांत महावरकर, अपर आयुक्त वसंत परदेशी, उपायुक्‍त डॉ. शिवाजी पवार, सहायक आयुक्त राजेंद्रसिंह गौर यांच्‍या मार्गदर्शनाखाली चाकणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, नाथा घार्गे, सहायक निरीक्षक प्रसन्न जराड, गणपत धायगुडे, अंमलदार हनुमंत कांबळे, भैरोबा यादव, सुनील शिंदे, शिवाजी चव्हाण, राजु जाधव, ॠषीकुमार झनकर, सुदर्शन बर्डे, सुनील भागवत, महेश कोळी, महादेव विक्कड, रेवनाथ खेडकर, शरद खैरणार, नितीन गुंजाळ, किरण घोडके, माधुरी कचाटे यांच्‍या पथकाने केली.