चेन्नई, दि. ३ (पीसीबी) – ऑनर किलिंगची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बहिणीचं दुसऱ्या तरुणावर प्रेम आहे म्हणून युवकाने त्याच्या बहिणीची हत्या केली. त्यानंतर तिच्या प्रियकराचं मुंडकं कापून रस्त्यावर ठेवलं. प्रवीण कुमार असं या प्रकरणातल्या आरोपीचं नाव आहे. त्याने त्याची बहीण महालक्ष्मी आणि तिचा प्रियकर सतीश कुमार यांची हत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महालक्ष्मीचं लग्न वानियानकुलम या ठिकाणी राहणाऱ्या एका व्यक्तीशी झालं होतं. पण त्यांच्यात खटके उडू लागले. त्यानंतर महालक्ष्मी तिचा भाऊ प्रवीण आणि तिच्या आईसह राहू लागली होती. चेन्नईतल्या मदुराई जिल्ह्यातल्या तिरुमंगलम या ठिकाणी ही घटना घडली.
नेमकी काय घडली घटना?
महालक्ष्मी आणि सतीश कुमार या दोघांची मैत्री झाली आणि त्यानंतर या दोघांमध्ये प्रेमसंबंध जुळले. महालक्ष्मीचा भाऊ प्रवीणला हे नातं मुळीच पसंत नव्हतं. त्याने बहिणीला तू सतीश कुमारशी नातं ठेवू नकोस असं वारंवार बजावलं होतं. मात्र महालक्ष्मीने त्याचं ऐकलं नाही. त्यामुळे मंगळवारी प्रवीणने सतीश आणि महालक्ष्मी यांची हत्या केली. तसंच सतीशचं मुंडकं धडावेगळं केलं आणि ते रस्त्यावर ठेवलं. प्रवीण त्याच्या बहिणीला मारत होता तेव्हा त्याची आई मधे पडली. तेव्हा प्रवीणने आईच्या उजव्या हातावरही वार केला. या प्रकरणी पोलिसांनी महालक्ष्मी आणि सतीश कुमार यांचे मृतदेह शवविच्छेदानासाठी पाठवले आहेत.
‘सैराट’ या सिनेमात जसा ऑनर किलिंगचा प्रकार दाखवण्यात आला आहे अगदी त्याच सिनेमाशी साधर्म्य साधणारी ही घटना आहे. द फ्री प्रेस जरनलने या विषयीचं वृत्त दिलं आहे. मंगळवारी रात्री प्रवीण आणि त्याच्या मित्रांनी सतीशला वाटेत अडवून त्याच्यावर धारदार शस्त्राने वार केले, परिणामी त्याचा मृत्यू झाला. प्रवीणने त्याचे शीर कापून सार्वजनिक ठिकाणी ठेवले. त्यानंतर त्याने घरी पोहोचून बहिणीची हत्या केली. जेव्हा आईने आपल्या मुलीला वाचवण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याने तिच्यावरही हल्ला केला आणि तिचा हात कापला. घटनेनंतर गावातील लोकांनी पोलिसांना याची माहिती दिली. त्यानंतर महालक्ष्मी आणि सतीश कुमार या दोघांचेही मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी मदुराईच्या जीआरएच रुग्णालयात नेण्यात आले आहेत. पोलिसांनी चारपैकी तीन हल्लेखोरांना ताब्यात घेतले असून फरार संशयिताचा शोध सुरू आहे.