ऑनड्यूटी असताना ऑनलाइन जुगार खेळणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यावर कारवाई करा – भाजपचे अमोल थोरात यांची मागणी

0
241

पिंपरी, दि. ११ (पीसीबी) – ऑनड्यूटी असताना ऑनलाइन जुगार खेळणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यावर कारवाई करा, अशी मागणी भाजपचे माजी मुख्य प्रवक्ते अमोल थोरात यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.आपल्या निवेदनात थोरात म्हणतात, ऑनलाइन जुगार किंवा ऑनलाइन गेम यापासून तरुण पिढीला वाचविण्यासाठी शासन व विविध घटकांकडून उपक्रम राबविले जात आहेत. तसेच विविध उपाययोजना केल्या जात आहेत. लहान मुलांना मोबाइलच्या व्यसनापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न पालक करतात. यात शासनाकडूनही वेळोवेळी जनजागृती करून आवाहन केले जात आहे. असे असतानाही पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयांतर्गत नियुक्तीस असलेले पोलिस उपनिरीक्षक सोमनाथ झेंडे हे ऑनड्यूटी असताना ऑनलाइन जुगार खेळतात. त्यातून त्यांना काही रक्कम मिळाली. त्याचा गाजावाजा करून त्यांनी ऑनलाइन जुगाराला चालना देण्याचे काम केले आहे. यातून लहान मुलांना ऑनलाइन जुगार व गेमबाबत खेळण्यासाठी प्रोत्साहन मिळेल. त्यामुळे अनेक लहान मुलांचे आयुष्य या ऑनलाइन जुगारामुळे बरबाद होऊ शकते.

ऑनलाइन जुगारामुळे अनेक संसार उद्ध्वस्त झाल्याचे वेळाेवेळी समोर आले आहे. याप्रकरणी काही वेबसाईट तसेच ॲप्सवरही कारवाई करण्यात आलेली आहे. ऑनलाइन जुगार पूर्णपणे बंद करण्यासाठी शासनस्तरावर कायदेशीर बाबींचा अभ्यास केला जात आहे. त्यासाठी कायदेतज्ज्ञांचा सल्ला व सायबर तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेण्यात येत आहे. असे असताना कायद्याचा संरक्षक म्हणवाऱ्या पोलिसानेच ऑनड्यूटी असताना ऑनलाइन जुगार खेळणे हे पोलिस दलासाठी मोठी लाजिरवाणी बाब आहे.

पोलिस उपनिरीक्षक सोमनाथ झेंडे यांनी ऑनड्यूटी असताना कामात कसूर करून, हलगर्जीपणा करून ड्रीम ११ या मोबाइल ॲप्सवर ऑनलाइन जुगार खेळला. त्यामुळे त्याला काही रक्कम मिळाला. आपण मोठी कामगिरी केली असल्याच्या आविर्भावात पोलिस उपनिरीक्षक सोमनाथ झेंडे यांनी सोशल मीडियावर स्वत:चे खाकी गणवेशातील फोटो व व्हिडिओ व्हायरल केले आहेत. त्यामुळे राज्याच्या पोलिस दलाबाबत चुकीचा संदेश दिला गेला.

पोलिस उपनिरीक्षक सोमनाथ झेंडे हे पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयांतर्गत चाकण पोलिस ठाण्यात नियुक्तीस असताना त्यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली होती. पोलिस तक्रारीवरून कारवाई न करण्यासाठी त्यांनी ७० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. त्यावरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २९ डिसेंबर २०२१ रोजी सापळा रचून पोलिस उपनिरीक्षक सोमनाथ झेंडे यांच्यावर कारवाई केली होती. त्यानंतर उपनिरीक्षक झेंडे निलंबित झाले होते. निलंबनाचा कालावधी पूर्ण करून झेंडे पुन्हा कर्तव्यावर हजर झाले. मात्र, त्यानंतरही त्यांनी कामाप्रति निष्ठा न ठेवता कर्तव्यात कसूर केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पोलिस उपनिरीक्षक यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी विनंती थोरात यांनी केली आहे.