ऑटोरिक्षा मीटर पुनःप्रमाणीकरण न केलेल्या रिक्षा चालकांवर कारवाई

0
145

पिंपरी, दि. १ (पीसीबी) – प्रादेशिक परिवहन प्राधिकरण पुणे यांनी पुणे, पिंपरी-चिंचवड व बारामती या कार्यक्षेत्रातील तीन आसनी ऑटोरिक्षांकरिता खटुआ समितीच्या शिफारशीनुसार 1 सप्टेंबर 2022 पासून भाडेवाढ लागू केलेली आहे. ऑटोरिक्षांचे मीटर पुनःप्रमाणीकरण करण्याकरीता मुदतवाढ देऊनही पुन:प्रमाणीकरण न करणाऱ्या ऑटोरिक्षा चालक, मालकांवर कारवाई करण्यात येणार आहे.

ऑटोरिक्षा धारकांनी त्यांच्या ऑटोरिक्षा भाडेमीटरचे पुनःप्रमाणीकरण व मीटर तपासणीचे काम विहीत मुदतीत न केल्याने तसेच ऑटोरिक्षा संघटनांकडून ऑटोरिक्षा परवानाधारक, पालकांची गैरसोय टाळण्यासाठी मीटर पुनःप्रमाणीकरणाकरीता मुदतवाढ मिळण्याबाबत केलेल्या मागणीचा विचार करता मीटर पुनःप्रमाणीकरण करण्यास सुरुवातीस 1 ते 30 नोव्हेंबर आणि नंतर 1 डिसेंबर 2022 ते 31 जानेवारी 2023 पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय प्रादेशिक परिवहन प्राधिकरण, प्राधिकरणाने घेतला होता.

मुदतीत मीटर कॅलीब्रेशन करून न घेणाऱ्या ऑटोरिक्षाधारकांवर परवाना निलंबन किंवा तडजोड शुल्काची कारवाई करण्यात येणार आहे. मीटर कॅलीब्रेशन न केल्यास मुदत समाप्तीनंतर विलंबासाठी किमान 7 दिवस व त्यापेक्षा अधिक प्रत्येक एक दिवसासाठी 1 दिवस आणि एकूण कमाल निलंबन कालावधी 40 दिवस राहणार आहे.

निलंबनाऐवजी तडजोड शुल्काचा विकल्प घेतल्यास मुदत समाप्तीनंतरच्या प्रत्येक दिवसासाठी 50 रूपये मात्र किमान 500 रूपये आणि कमाल तडजोड शुल्क 2 हजार रूपयांपर्यंत असेल. मीटर तपासणीचे काम फुले नगर व आळंदी रस्ता चाचणी मैदान येथे सुरूच राहील, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे यांनी कळविले आहे.