काळाखडक झोपडपट्टी रहिवासी संघातर्फे निवेदन
वाकड, दि. 13 (प्रतिनिधी)
वाकड येथील काळाखडक झोपडपट्टीचे पुनर्वसन करण्यात येत आहे. त्यासाठी एसआरएअंतर्गत प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पाला विरोध करणाऱ्या अपना वतन संस्थेचा संस्थापक अध्यक्ष सिद्धीक शेख यांच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी काळाखडक रहिवासी संघातर्फे करण्यात आली आहे.
काळाखडक रहिवासी संघातर्फे गुरुवारी (दि. 12) वाकड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निवृत्ती कोल्हटकर यांच्याकडे निवेदन देण्यात आले. निवेदनात नमूद आहे की, काळाखडक झोपडपट्टी येथे झोपडपट्टी पूनर्वसन प्रकल्प राबविण्यात येत आहे. स्थानिक झोपडीधारकांचा या प्रकल्पाला पूर्णपणे पाठींबा आहे. सिद्धीक शेख यांचा या प्रकल्पाशी काहीही संबंध नसताना तसेच शेख हे काळाखडक येथील रहिवासी नसून देखील प्रकल्पाबाबत चुकीची माहिती देऊन स्थानिकांची दिशाभूल करत आहेत. बोगस आणि मयत व्यक्तींच्या सह्यांचे पत्र वेगवेगळ्या शासकीय कार्यालयांमध्ये जमा केले आहे. याबाबत झोपडीधारकांनी पोलिसांकडे तक्रार अर्ज केले आहेत. त्या तक्रारींची दखल घेत योग्य तो तपास करून सिद्धीक शेख यांच्या विरोधात कारवाई करण्यात यावी. या सह्यांच्या गैरवापरामुळे प्रकल्पामधील कोणताही झोपडीधारक अपात्र ठरून हक्काच्या घरापासून वंचित राहिल्यास शेख यांना जबाबदार धरण्यात यावे.
सिद्धीक शेख राहत असलेल्या वाकड येथील अण्णा भाऊ साठे नगर येथे झोपडपट्टी पूनर्वसन प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पात स्वत:ला घर मिळत असल्याने या प्रकल्पाला शेख यांनी पाठींबा दिला. मात्र, काळाखडक येथील प्रकल्पाला वैयक्तिक स्वार्थासाठी विरोध करीत आहेत. शेख यांच्या या दुटप्पी भूमिकेविरोधात काळाखडक येथील रहिवाशांनी 2 एप्रिल 2024 रोजी आंदोलन केले होते. त्या आंदोलनाचा राग मनात धरून शेख यांच्याकडून पूनर्वसन प्रकल्पाचे विकसक, काळाखडक रहिवासी संघाचे पदाधिकाऱ्यांना चुकीच्या पद्धतीने नोटीसा देण्यात येत आहेत.
दरम्यान, काळाखडक झोपडपट्टी पूनर्वसन प्रकल्पातील प्राथमिक पात्रता यादी 2 सप्टेंबर 2024 रोजी प्रसिद्ध झाली. याबाबत शेख यांनी चुकीची माहिती देऊन ही यादी बोगस असल्याची अफवा पसरवून स्थानिक झोपडीधारकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनेला बोगस बोलणाऱ्या शेख यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी निवेदनातून केली आहे.
सिद्धीक शेख यांनी काळाखडक झोपडपट्टीमधील स्थानिक नागरिकांच्या तसेच मयत व्यक्तींच्याही सह्या घेतल्या. त्याचा गैरवापर करून एसआरए अधिकारी व यंत्रणेची दिशाभूल करीत आहेत. अशा सह्या घेऊन पात्र झोपडीधारक घरापासून वंचित राहिल्यास शेख जबाबदार राहितील. त्यांच्यावर कारवाई करावी, अशी आमची मागणी आहे, असे प्रकाश गायकवाड म्हणाले.
काळाखडक झोपडपट्टीतील सर्वसामान्य लोकांना न्याय देण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे संबंधित बिल्डरकडून काही लोकांना पुढे करून मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मी कायदेशीर लढा देतोय. याप्रकरणी संबंधितांना कायदेशीर नोटीस बजावली आहे, असे अपना वतन संघटना संस्थापक अध्यक्ष सिद्धीक शेख यांनी सांगितले.