‘एसआयटीचा म्होरक्या बाहेरचा, इतर पोलीस वाल्मिकचे’; राष्ट्रवादीच्या जितेंद्र आव्हाड यांच्या दाव्याने खळबळ..

0
10

बीड दि. 5 (पीसीबी) : संतोष देशमुख प्रकरणात शासनाने नेमलेल्या एसआयटीवरून सध्या आरोप-प्रत्यारोप बघायला मिळत आहेत. रविवारी (ता.5) याबाबत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मोठा दावा करताना SIT पथकावरच आक्षेप घेतला होता. ‘हे’ पथक निष्पक्ष चौकशी करणार का? असा सवाल त्यांनी केला होता. यानंतर आता शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतील एका बड्या नेत्याने एसआयटीच्या पथकातील महेश विघ्ने यांच्यावरून खळबळजनक दावा केला आहे. यामुळे हे प्रकरण आता चांगलेच तापण्याची शक्यता दिसत आहे.

संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे. यामध्ये मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराडचे कनेक्शन असल्याचे बोलले जात आहे. पण त्याला 21 दिवस होऊनही अटक झाली नव्हती. यावरून सरकारवर विरोधकांसह देशमुख कुटुंबियांने प्रश्न उपस्थित केले जात होते. यानंतर वाल्मिक कराड सीआयडीला पुण्यात शरण आला. यानंतर या प्रकरणाच्या तपालासा गती देण्यासाठी सीआयडीसह एसआयटी तपास करत आहे. पण आता एसआयटी पथकावरच संशय घेतला जात आहे.

बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी एसआयटी तपास पथकाची मानवाधिकार आयोगाकडे तक्रार केली आहे. तर दमानिया यांनी एसआयटी पथकावरच आक्षेप घेतला आहे. यानंतर आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे विधीमंडळ गटनेते जितेंद्र आव्हाड यांनी देखील गंभीर आरोप केले आहेत. आव्हाड यांनी संतोष देशमुख प्रकरणातील एसआयटी पथकातील अधिकाऱ्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना, एसआयटीचे प्रमुख पीएसआय बाहेरील आहेत. तर त्यांच्याखाली असलेले अधिकारी हे पोलीस वाल्मिक कराडचे असल्याचा दावा केला आहे.

एसआयटी पथकातील पीएसआय महेश विघ्नेच पाहा. ज्याचे धनंजय मुंडे निवडून आल्यावरचा फोटो आहेत. या फोटोत त्याचे आणि वाल्मिक कराडचे किती जवळचे अन प्रेमाचे संबध आहेत, ते दिसत आहे. हे असले अधिकारी वाल्मिकला शिक्षा देतील की मदत करतील? असे आव्हाड यांनी म्हटले आहे.

तर विघ्ने याने निवडणूक काळात धनंजय मुंडेचा कार्यकर्ता असल्याप्रमाणे काम केल्याचा आरोपही आव्हाड यांनी केला आहे. तसेच दुसरा मनोजकुमार वाघ हा वाल्मीक कराडचा आत्यंत खास माणुस असून गेले १० वर्षे तो बीड एलसीबीमध्येच आहे आणि वाल्मीकसाठी काम करतोय असेही आरोप एक्सवर पोस्ट करत जितेंद्र आव्हाड यांनी केले आहेत. यामुळे आता एकच खळबळ उडाली आहे.